नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल | पुढारी

नाशिक : 43 सिग्नल्स दुरुस्तीला आयुक्तांचा ग्रीन सिग्नल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये बसवलेले सिग्नल्स वारंवार बंद पडत असल्यामुळे नाशिककरांना वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात ट्रॅफिक सेलच्या बैठकीत मुद्दे उपस्थित झाल्यानंतर बंद पडलेले सिग्नल्स तातडीने दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 30 लाख रुपये खर्चून 43 सिग्नलचे वार्षिक व्यवस्थापन केले जाणार आहे. याबाबत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महासभेत निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी दिली.

शहरात सर्वसाधारण 30 मीटर रुंदीचे चार ते पाच मुख्य रस्ते आहेत. 12 मीटरपेक्षा अधिक अरुंद रुस्त्यांवर वाहतूक कोंडीच्या समस्येनुसार सिग्नल बसविण्यात आले आहेत. जवळपास 47 सिग्नल्स शहरात आहेत. पैकी चार सिग्नलचे व्यवस्थापन हे स्मार्ट सिटीमार्फत केले जाते. 43 सिग्नलचे व्यवस्थापन महापालिकेमार्फत होत आहे. यातील अनेक सिग्नल अचानक बंद होत असल्याने वाहनधारकांना लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. महापालिकेकडे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे सिग्नल व्यवस्थापन करणे विद्युत विभागाला शक्य होत नाही. यामुळे गेल्याच वर्षी सिग्नलच्या खासगीकरणातून व्यवस्थापन करण्यासाठी एक वर्ष मुदतीची निविदा काढण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने शहरात अनेक ठिकाणी सिग्नल बंद असल्याच्या तक्रारी आहेत.

मध्यंतरी झालेल्या ट्रॅफिक सेलच्या बैठकीमध्येदेखील ही बाब पुढे आल्यामुळे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी तातडीने सिग्नल देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्युत विभागाने महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. त्यानुसार आता 43 सिग्नल व्यवस्थापनासाठी 24 लाख 70 हजार रुपये तसेच त्यावर 18 टक्के जीएसटी याप्रमाणे 4 लाख 44 असे एकूण 29 लाख 14 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. सतत होणारा वापर, लहान-मोठे अपघात, रस्ता रुंदीकरण, चौक सुशोभीकरण आदी प्रमुख कारणांमुळे सिग्नल यंत्रणा बंद पडतात. त्यामुळे नवीन पोल उभारणे, जुने पोल स्थलांतरित करणे, सिग्नलचे सुटे भाग बदलणे आदी कामे ठेकेदारांमार्फत करून घेतली जाणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button