नाशिक पोलिस आयुक्तालयाला विजेतेपद | पुढारी

नाशिक पोलिस आयुक्तालयाला विजेतेपद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नंदुरबारला पार पडलेल्या 33 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक शहर पोलिस दलाच्या पुरुषांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारांत सर्वोच्च 142 गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तर नाशिक शहर पोलिस दलाच्या महिलांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारांत सर्वोच्च 120 गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपदाला गवसणी घातली.

नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांच्या पुरुष गटात नाशिक ग्रामीण पोलिस दलाचा संघ 96 गुण मिळवून दुसर्‍या क्रमांकावर, धुळे जिल्हा पोलिस दल 72 गुण घेऊन तृतीय स्थानावर, जळगाव जिल्हा पोलिस दल-69 गुणांसह चतुर्थ स्थानावर, अहमदनगर पोलिस दल-64 गुणांसह पाचव्या स्थानावर आणि नंदुरबार जिल्हा पोलिस दल-54 गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला. तर महिला गटात अहमदनगर पोलिस दलाचा संघ 87 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नंदुरबार जिल्हा पोलिस दल 45 गुणांसह तिसर्‍या, जळगाव जिल्हा पोलिस दल 44 गुणांसह चौथ्या, नाशिक ग्रामीण पोलिस दल 32 गुणांसह पाचव्या, तर धुळे जिल्हा पोलिस दल 22 गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला. नाशिक शहर पोलिस दलाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक बहाल करण्यात आला. सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानावर असलेल्या खेळाडूंना व संघांना नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, धुळेचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगरचे पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धेत 776 खेळाडूंचा सहभाग…
नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर असे 6 संघ हे सांघिक व वैयक्तिक प्रकारांत सहभागी झाले होते. स्विमिंग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, 100, 200, 400, 800 मीटर धावणे, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, भालाफेक आदी क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 776 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

हेही वाचा:

Back to top button