Nashik : फक्त दिवसा लाइट द्या हो, शेतकर्‍यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक पोस्ट

शेतक-यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र,www.pudhari.news
शेतक-यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी
शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी रात्री वीजपुरवठा केला जात असल्याने पिकाला पाणी सोडण्यासाठी रात्रभर शेतात जागरण करावे लागत असल्याने शेतकर्‍यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घालणारे मेसेज व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. शेतकरी वाचला तरच सरकार वाचेल, असे भावनिक साद घालणारे मेसेजेस फिरत आहेत.

शेतीसाठी विद्युत मंडळाकडून दरमहा वीजपुरवठ्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते आणि त्यानुसार विद्युतपुरवठा केला जातो. पण हे वेळापत्रक कागदावरच राहिले आहे. सध्या रब्बी हंगामातील कामांना वेग आला असून, शेतीपिकांना पाणी देण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रब्बीच्या लागवडीसाठी शेतकरी सध्या दिवसभर शेतात राबतो. परंतु दिवसभर वीजपुरवठा खंडित असतो. रात्री दहा-बारानंतर वीजपुरवठा सुरू होत असल्याने शेतात पाणी भरण्यासाठी हजारो शेतकर्‍यांना रात्रभर शेतात मुक्कामी पहारा ठेवावा लागत आहे. महावितरणच्या या कारभाराला आणि दररोजच्या जागरणाला बळीराजा कंटाळला आहे. त्यातूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भावनिक पोस्टद्वारे साद घातली जात आहे.

आम्ही रात्रभर का जागं राहायचं?
ज्या कोणी हा निर्णय घेतला असेल तो आम्हाला वैरी समजत असावा आणि रात्री शेतीला वीज देतो. रात्री डीपीवरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी मंडळाने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसतात. आम्हा शेतकर्‍यांना जीव धोक्यात घालून फ्यूज टाकावे लागतात.

येवढं करून आमच्या हातात काय पडतंय?
आम्हाला वाटलं 57 वर्ष वाटोळं झालं आता नवं सरकार आलं, चांगले दिवस येतील, पण घरातील मोठे माणसे सांगत होते काहीच फरक पडणार नाही, तरी आमची कोणाकडूनही अपेक्षा राहिली नाही पण जमते का बघा.अहो साहेब रात्री घरातून बाहेर निघालो तर आई म्हणते भाऊ बूट घातले का ?
बायको टॉर्च देते, वडील म्हणतात काठी घेतली का ?
मी येतो तुझ्याबरोबर. रात्री साप, विंचू, बिबट्यासारखे संकटे असतात.
मी शेतात अंधारात असताना त्यांना झोप लागत असेल का हो?
मी तुमच्याकडे फार मोठी मागणी करत नाही, सहज शक्य आहे फक्त शेतीला दिवसा किमान 12 तास लाइट द्यावी ही विनंती.
प्रत्येक शेतकर्‍याने व शेतकर्‍यांबद्दल आत्मीयता असणार्‍यांनी ही पोस्ट इतकी शेअर करा की ती मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचेल व आम्हा शेतकरी बांधवांना न्याय मिळेल ?
आपला एक
आशावादी शेतकरी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news