नाशिकमध्ये प्रगतिशील लेखक संघाचा जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन | पुढारी

नाशिकमध्ये प्रगतिशील लेखक संघाचा जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रगतिशील लेखक संघ, नाशिक शाखा, इंडियन पीपल्स थिएटर (आयपीटीए) नाशिक, कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने रविवारी (दि. 6) रोटरी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे नाशिक जिल्ह्यातील प्रागतिक, परिवर्तनवादी साहित्यिकांचा मेळावा होत आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, जाती अंत, वर्ग अंत, स्त्री दास्यमुक्त समाजनिर्मितीसाठी सांस्कृतिक रेटा निर्माण करणे, ही मेळावा आयोजनामागची भूमिका आहे, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र ही पुरोगामी भूमी म्हणून ओळखली जात असली, तरी शोषणमुक्त समाजाचे ध्येय मराठी साहित्यिकांनी ठेवले नाही. ही उणीव भरून काढण्याचे काम गेली 90 वर्षे प्रगतिशील लेखक संघ करतो आहे. ही भूमिका घेऊन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजातील अत्यंत धडाडीने कथालेखन करणारे आणि कथेच्या माध्यमातून प्राकृतिक विचार मांडणार्‍या संजय दोबाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. सकाळी 9.30 ते 10.00 या वेळेत संघटनात्मक रचना व निवड होईल. पहिले सत्र 10.00 ते 11.00 या वेळेत उद्घाटन होणार असून, पुणे येथील होप फाउंडेशनचे संस्थापक प्रसिद्ध डॉ. अमोल देवळीकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. मेळाव्याचे स्वागताध्यक्ष नाशिक येथील भारत ज्ञान-विज्ञान समुदायाची सांस्कृतिक धुरा सांभाळणारे कवी आणि लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. समीर अहिरे भूषविणार आहेत.

या मेळाव्यामध्ये लोकवाङ्मयगृह या प्रकाशनाचे संचालक, कामगार नेते भालचंद्र कांगो, समीक्षक, साहित्यिक जी. के. ऐनापुरे व पत्रकार, साहित्यिक उत्तम कांबळे यांचा सत्कार होणार आहे. 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून दलित पँथरवर एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी पँथर नेते अर्जुन डांगळे उपस्थित राहणार आहेत. समीक्षक, साहित्यिक जी. के. ऐनापुरे हे बीजभाषण करणार आहेत. कामगार नेते भालचंद्र कानगो व राजू देसले हे श्रोत्यांशी मुक्त संवाद साधणार असून, उत्तम कांबळे हे व्याख्यान देणार आहेत. स्वतंत्र परिसंवादामध्ये इस्लामपूर येथील प्रा. सचिन गरुड मनोगत व्यक्त करतील. नाशिक येथील कामगार नेते करुणासागर पगारे हेही सहभाग नोंदविणार आहेत. मेळावा यशस्वीतेसाठी प्रगतिशील लेखक संघ नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रमोद अहिरे, सचिव प्रल्हाद पवार, कोषाध्यक्ष विश्वास वाघमारे, साहित्यिक तुकाराम चौधरी, तल्हा शेख, विराज देवांग, विलास नलावडे हे प्रयत्नशील आहेत. दरम्यान, नाशिक शाखेच्या वतीने शनिवारी (दि. 5) ऑनलाइन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button