नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी | पुढारी

नाशिक : ‘चला जाणू या नदीला’ अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नद्यांबाबत जनसामान्यांशी संवाद, समन्वय, नद्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या औचित्याने चल जाणू या नदीला अभियान शासनाने हाती घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी जनसहभागातून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.31) झालेल्या चला जाणू या नदीला या अभियानासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीप्रसंगी तेे बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील नद्यांनिहाय नियुक्त समन्वयक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, ‘चला जाणू या नदीला’ या अभियानात सर्वप्रथम नदीलगतच्या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच व गावकरी यांच्याशी संवाद प्रबोधनपर अभियानाचे आयोेजन करणे आवश्यक आहे. या संवादातून नद्यांच्या संवर्धनासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचेल व यातून परिणामी गावकर्‍यांचा सहभाग निश्चितच वाढणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत लोकसंवादाचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना गंगाथरन डी. यांनी यावेळी दिल्या.

नदी साक्षर व्हावे : पुलकुंडवार
चला जाणू या नदीला या अभियानाला प्रत्येकाने केवळ शासकीय उपक्रम म्हणून न पाहता त्याकडे नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्य भावनेतून पाहायला हवे. प्रत्येकाने या अभियानातून नदी साक्षर होण्याचा संकल्प केल्यास खर्‍या अर्थाने आपल्या नद्या अमृतवाहिन्या होतील, असा विश्वास चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केला. नदीपात्राची होणारी धूप, नदीप्रदूषण व स्वच्छता याबाबत जनजागृती , अभ्यासपर लोकशिक्षण व प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

सहभागी नद्या
वालदेवी नदी, कपिला नदी, नंदिनी नदी, म्हाळुंगी नदी, मोती नदी

हेही वाचा :

Back to top button