धुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू | पुढारी

धुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

धुळे, पुढारी वृत्तसेवा : विजेचा प्रवाह उतरलेल्या पोलला हात लावल्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला. कुणाल प्रभाकर घरटे असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. ही घटना धुळ्यातील कुमार नगर येथे घडली.  याच भागात ही दुसरी घटना घडली असून वीज वितरण कंपनीने तातडीने नादुरुस्त वीज पोल्सची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

धुळे शहरातील कुमार नगरमध्ये राहणारा कुणाल प्रभाकर घरटे हा युवक जय हिंद महाविद्यालयातील विद्यार्थी असून तो बास्केटबॉल आणि फ्लोअर बॉल या खेळातील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता. घराजवळ असलेल्या पोलला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. ही बाब निदर्शनास आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याच्या हालचाली करण्यात आल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

कुणालच्या पार्थिवावर काल (दि.२३) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे. कुमार नगर परिसरात यापूर्वी अशाच पद्धतीने घराजवळ असलेल्या पोलला हात लागल्याने विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी देखील वीज वितरण कंपनीला सूचना करून देखील त्यांनी नादुरुस्त केबल दुरुस्तीचे काम पूर्णपणे केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button