नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरात ठिकठिकाणी यंदाही विविध सामाजिक, सामाजिक संस्थांतर्फे दिपोत्सवानिमित्त सांज पाडवा, पहाट पाडवा आणि दिवाळी पहाट अशा बहारदार गीत संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगितीक मेजवानीचा आस्वाद घेत एकूणच नाशिककरांची दिवाळी मनोरंजनात जाणार आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील नाशिकसह सहा ठिकाणी दीपावलीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावली पहाट व दीपावली संध्या या स्वरूपात होणाऱ्या या सांगितिक कार्यक्रमांचे नाव 'लखलख चंदेरी' असे आहे. यातील पहिला कार्यक्रम रविवारी (दि.२३) ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता नागपूरच्या वंजारी नगर मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक येथे नाशिक येथे मंगळवारी (दि.२५) संध्याकाळी ६.३० वाजता दीपावली संध्या कार्यक्रम होणार आहे. डॉ. गणेश चंदनशिवे, आकांक्षा कदम, समाधान आणि इतर कलाकार आपली कला सादर करतील. तर बुधवारी (दि.२६) सकाळी ६ वाजता दीपावली पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संजीव चिम्मलगी, केतन पटवर्धन, मधुरा कुंभार आणि संच कार्यक्रम सादर करतील. दोन्ही कार्यक्रम नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहेत.
इंदिरानगरला आज साद स्वरांची
इंदिरानगरमधील सिटी गार्डनसमोरील परिसरात रविवारी (दि.२३) सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच अभ्यासिकेच्या सहकार्याने अमोल पाळेकर प्रस्तुत साद स्वरांची मैफल होणार आहे. विविध स्पर्धेतील विजेते गायक गौरी गोसावी, चैतन्य कुलकर्णी व चैताली पानसरे, चैतन्य लोखंडे यात सहभागी होतील, असे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी दिली. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन खोडे यांनी केले आहे.
मंगळवारी सांज पाडवा
झंकार म्युझिकल ग्रुपतर्फे मंगळवारी (दि.२५) वासननगर येथील गामणे मैदानावर सायंकाळी ६ वाजता सांज पाडवा मैफल होणार आहे. माजी नगरेसवक भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड आणि एकनाथ नवले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उपस्थित श्रोत्यांमधून दहा भाग्यवंत महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
युनिक ग्रुपतर्फे पाडवा पहाट
इंदिरानगर येथील युनिक ग्रुपतर्फे बुधवारी (दि.२६) राणेनगर येथील शारदा शाळेजवळील मैदानात पहाटे ५.३० वाजता पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष तथा मनपाचे माजी सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी दिली. मराठी भक्तीगीते, भावगीते आणि निवडक हिंदी गीतांचा कार्यक्रमात सभावेश असेल. अनिता सोनवणे आणि भाजप व्दारका मंडल युवा मोर्चाचे सरचिटणीस अनिकेत सोनवणे हे कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत.
गुरूवारी राहुल देशपांडेंची मैफल
नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त गुरूवारी (दि.२७) गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यान येथे पहाटे ५ वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द गायक राहूल देशपांडे यांच्या सुरेल स्वरांनी सजलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमास नाशिककरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे.