नाशिक : अशोकस्तंभ-त्र्यंबक नाका स्मार्ट रोडची तोडफोड | पुढारी

नाशिक : अशोकस्तंभ-त्र्यंबक नाका स्मार्ट रोडची तोडफोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या 1.1 किमी रस्त्याची कंपनीकडून त्र्यंबक नाक्याजवळ पिण्याची पाइपलाइन टाकण्याच्या नावाखाली तोडफोड करण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच हा स्मार्ट रोड अत्यंत वादग्रस्त ठरला होता. काम पूर्ण करण्यासाठी 16 महिने मुदत असलेल्या या रस्त्याचे काम जवळपास तीन वर्षे चालले होते.

स्मार्ट सिटी कंपनीतर्फे अनेक विकासकामांपैकी प्रायोगिकतत्त्वावर अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड तयार करण्यात आला. या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू राहिल्याने या भागातील शाळा-महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालये आणि व्यावसायिकांना अडीच ते तीन वर्षे त्रास सहन करावा लागला. व्यावसायिकांना तर आर्थिक झळ सोसावी लागली. यामुळे नको तो स्मार्ट रोड असे म्हणण्याची नाशिककरांवर वेळ आली होती. 16 कोटी रुपयांचे काम सुमारे 20 कोटींपर्यंत गेले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करूनही रस्त्यातील त्रुटी आजही दूर होऊ शकलेल्या नाहीत. रस्त्यावर ठिकठिकाणी उभारलेल्या ई-टॉयलेटची आज दुरवस्था झाली आहे. त्याकडे पाहण्यास स्मार्ट सिटी कंपनीला आणि संबंधित ठेकेदाराला वेळ नाही. त्यात आता कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्याची तोडफोड सुरू करण्यात आली आहे. त्र्यंबक नाक्याजवळ पाइपलाइनसाठी स्मार्ट रोडच्या पादचारी मार्गाचे खोदकाम सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारची काही कामे करायची असल्यास तोडफोड न करता पाइपलाइन, वीजतारा तसेच विविध प्रकारच्या केबल्स टाकता याव्यात, याकरिता सर्व्हिस डक्ट टाकण्यात आलेले आहेत. असे असताना तोडफोड केली जात असेल तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी फुटपाथ खोदण्यात आला आहे. जून 2023 पर्यंत ही योजना पूर्णत्वास जाईल. त्यासाठी 25 कोटींची तरतूद असून, दीक्षितवाडा, गोल्फ क्लब तसेच पंचवटी या ठिकाणी जलकुंभ आणि दोन जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर करण्यात आल्याने त्या कामांंतर्गत खोदकाम सुरू आहे. – सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी.

हेही वाचा:

Back to top button