शेतकर्‍यांसाठी विशेष कृती आराखडा ; मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सरकार हे कष्टकरी जनता, वारकरी, शेतकर्‍यांचे आहे. त्यांच्या हिताचे निर्णय झपाट्याने सरकार घेत आहे. भू-विकास बँकेच्या शेतकर्‍यांची कर्जमाफी असो, अथवा शेतकर्‍यांची नुकसानभरपाई असो तसेच नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांचे तातडीने कर्ज मंजूर प्रकरणे असोत, आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेण्याला अग्रक्रमाने प्राधान्य देत आहोत. शेतकर्‍यांच्या शाश्वत विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये दिली.

नासिक सहकारी साखर कारखानाच्या 2022-23 च्या गळीत हंगामाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री तरुण राठी, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, किशोर दराडे, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष हरगिरी महाराज, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, नीलेश श्रींगी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुकदेव शेटे, दीपक चंदे, सागर गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असून, सरासरी 95 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. तसेच या हंगामात 203 कारखाने सुरू होऊन 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षीचा देशात 60 लाख मेट्रीक टन साखरेचा साठा आहे. त्यापैकी 30 लाख मेट्रीक टन साखर एकट्या महाराष्ट्रात आहे. आगामी काळात भारतातून 100 लाख मेट्रीक टन साखर निर्यात होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवित महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा 60 लाख मेट्रीक टन राहण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्ती केली.देशातील साखर उत्पादन्नात उत्तरप्रदेशपेक्षा यंदा महाराष्ट्राने आघाडी घेत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला मागे टाकले आहे. राज्याच्या विकासातही शेतकर्‍यांचा मोठा वाटा राहिला आहे. इथेनॉलची इंधनामधील मर्यादा सातत्याने वाढविली जात आहे. भविष्यात इथेनॉलवर धावणारी वाहनांची निर्मिती होईल. त्यामुळे साखर कारखान्यांत तयार होणार्‍या इथेनॉलला मागणी वाढेल. त्यातूनच साखर उद्योगाला बुस्ट मिळेल, असा आशावादही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. सततच्या व परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषात बदल करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जास्तीत मदत कशी होईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमचे सरकार 'वर्क फ्रॉम रोड' :

तीन महिन्यांपूर्वी उठाव करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यापुर्वीचे सरकार हे 'वर्क फ—ॉम होम' करत होते. त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांचे प्रश्न कळलेच नाहीत. आमचे सरकार 'वर्क फॉम रोड' म्हणजेच रस्त्यावर उतरुन काम करीत आहे. त्यामुळे आम्हाला सामान्य जनतेच्या समस्या, अडचणी समजतात. आम्ही धडाडीचे अन् लोककल्याणाचे अनेक निर्णय घेत आहोत. वर्क फ—ॉम होमचे सरकार बदलले नसते तर सणोत्सवही झाले नसते, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news