नाशिक : शाळा बंद विरोधात एकवटल्या संघटना | पुढारी

नाशिक : शाळा बंद विरोधात एकवटल्या संघटना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
20 पटसंख्येच्या खालील शाळा बंदच्या विरोधात पुण्यात 65 शिक्षक संघटना एकवटल्या. शिक्षण नाही तर मत नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.

मुलांच्या शिक्षणावरील केला जाणारा खर्च हा गुंतवणूक नसून तो मूलभूत अधिकार असल्याने त्याकडे व्यापारी तत्त्वानुसार बघून चालणार नाही, असा विचार यावेळी मांडण्यात आला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे, शिक्षकभारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, शिक्षक संघाचे अध्यक्ष अंबादास वाजे यांसह शिक्षक समिती, अ‍ॅक्टिव टीचर्स फोरम, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, छात्रभारती, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, नर्मदा बचाव आंदोलन, एम पुक्टो, समाजवादी अध्यापक सभा, विद्यार्थी सेना, आप पालक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती या बॅनरखाली राज्यात आंदोलन उभे करण्याचा निर्णय झाला. येत्या काळात महसूल विभाग पातळीवर शिक्षण हक्क परिषदा घेणे तसेच निर्धारित तारखेला राज्यातील सर्व गावांत गावकरी, शिक्षक आणि विद्यार्थी घंटानाद आंदोलन करून शासनाला इशारा देणे, आमच्या शाळा बंद करू नका, शिक्षणाचा अधिकार हिरावून घेऊ नका, अशी आर्त विनवणी करणारे पत्र विद्यार्थी, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती तसेच उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पाठविणे, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामसभा ठराव संमत करून शासनाला आणि न्यायालयाला पाठविणे, असा कार्यक्रम यावेळी ठरविण्यात आल्याचे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button