नाशिक : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे दिवाळे! | पुढारी

नाशिक : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे दिवाळे!

सिन्नर/नांदूरशिंगोटे : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
सिन्नर शहरासह तालुक्यात पुन्हा सोमवारी (दि. 17) मध्यरात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. शहरात सरस्वती नदीलगतच्या घरांच्या उंबर्‍यावर पाणी आले होते. त्यामुळे रहिवाशांची झोप उडाली होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देवनदी, म्हाळुंगी, सरस्वतीला पुन्हा पूर आला.

दापूर परिसरात मागील महिन्यात झालेल्या पावसापेक्षा दुपटीने जास्त पाऊस बरसला. मागील पावसात वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करण्यात आले होते. मात्र तेच रस्ते या पावसाने पूर्णपणे वाहून गेले. यामध्ये जुना सिन्नर – दापूर रस्ता, साबळे वस्तीजवळचा रस्ताही वाहून गेला.

काकडी पिकात घुसलेले पाणी.

सुदामबाबा मंदिराजवळ दापूर गावाला जोडणारा रस्ता पुन्हा वाहून गेला. हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. दापूर शिवारात लाल व उन्हाळ कांदा रोपे टाकलेली होती. ती रोपे पूर्णपणे नष्ट झालेली आहे. काही शेतकर्‍यांनी कांदा लागवड केली होती. कांद्यासह वालवड, टोमॅटो, घेवडा आदी पिके पूर्णपणे वाहून गेली. सध्या शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पिके सडणार आहेत.दरम्यान, दापूर परिसरात रामनाथ रामचंद्र आव्हाड, पोपट सुकदेव आव्हाड, बाबूराव सुकदेव आव्हाड, पांडुरंग भिकाजी आव्हाड, सखाराम निवृत्ती साबळे, भरत यमनाजी बेदाडे आदींसह काही शेतकर्‍यांच्या शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.

चास – कासारवाडीचा संपर्क काही काळ तुटला
चास, कासारवाडी परिसरात म्हाळुंगी नदीला आलेल्या पुराने रौद्र रूप धारण केल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. भोजापूर धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बहुतांश भागात सोयाबीन मका पिके काढणीयोग्य असताना व काही ठिकाणी काढून ठेवलेली असताना ती पाण्यावर तरंगताना दिसून आली.

हेही वाचा :

Back to top button