भाजपाचा महाविकास आघाडीला ‘दे धक्का; नंदुरबार झेडपीत घडवले सत्तांतर

भाजपाचा महाविकास आघाडीला ‘दे धक्का; नंदुरबार झेडपीत घडवले सत्तांतर

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या डॉ. सुप्रिया गावित अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसमधील बंडखोर सुहास नाईक विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाचे 5, राष्ट्रवादीचे 4 आणि शिवसेनेचे 2 अशा 10 सदस्यांनी पक्षादेश झुगारून भाजपाला मतदान केल्याने हे सत्तांतर घडून आले ही सर्वात धक्कादायक राजकीय पार्श्वभूमी या निवडी मागे आहे.

येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची अडीच वर्षांची मुदत संपल्यामुळे आज, सोमवारी (दि. 17) पुन्हा या पदासाठी निवड होती. यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट सीमा वाळवी यांनी काँग्रेसच्यावतीने तर भाजपाकडून डॉक्टर सुप्रिया गावित यांनी अर्ज दाखल केला होता. 56 सदस्यांपैकी सीमा वळवी यांना 25 तर डॉक्टर सुप्रिया यांना 31 मते मिळाली. यामुळे भाजपाच्या सुप्रिया गावित यांना विजयी घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे बंडखोर सदस्य सुहास नाईक यांनी भाजपाकडून अर्ज दाखल केला, तर विद्यमान उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी शिंदे गटाच्या बाळासाहेब शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. तथापि राम रघुवंशी यांना 25 मते मिळाली, तर सुहास नाईक यांना 31 मते मिळाली यामुळे सुहास नाईक यांना विजयी घोषित करण्यात आले.

यात काँग्रेसचे पाच राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचे दोन असे 11 सदस्य फुटून भाजपाला मिळाले असल्याचे स्पष्ट झाले. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या पत्नी डॉक्टर कुमुदिनी गावित यांनी याआधी दोन वेळेस जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्यानंतर आज त्यांची कन्या डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाल्या. सभागृहात तसेच सभागृह बाहेर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपाचे आमदार राजेश पाडवी, भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार शरद गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल यांच्यासह सर्व उपस्थित सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला.

नंदुरबार जिल्हा भाजपामय होत असल्याचे पाहायला मिळत आहे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आणि भाजपाच्या विकासात्मक राजकारणावर जनतेने दर्शवलेला हा विश्वास आहे, अशा शब्दात याप्रसंगी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्रातील अधिक अधिक निधी आणि योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवता येतील आणि डॉक्टर सुप्रिया गावित या जिल्ह्याच्या विकास कामात पुढचे पाऊल टाकणाऱ्या अध्यक्ष म्हणून सिद्ध होतील, असा विश्वास खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता स्थापन होते, दिवाळीआधी फटाके कुणाचे फुटतात याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे काही सदस्य भाजपसोबत गेल्याची चर्चा रविवारी दिवसभर होती. त्यामुळे त्या घडामोडींकडेही लक्ष लागून होते.

असे आहे बलाबल….

काँग्रेस: २४

भाजप : २०

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ८

राष्ट्रवादी : ४

एकूण: ५६

बहुमतासाठी सदस्य संख्या : २९

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news