सुरक्षेसाठी खडसेच करायचे धमकीचा फोन, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट | पुढारी

सुरक्षेसाठी खडसेच करायचे धमकीचा फोन, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

जळगाव : जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणावरुन जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील पोलीस ठाण्यात खडसेंनी तब्बल १८ तास ठिय्या आंदोलन केलं होतं. यानंतर रातोरात खडसेंचं पोलीस संरक्षण काढण्यात आलं. यावरुनच भाजप नेते गिरीश महाजन यांनी आ.एकनाथ खडसे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ खडे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांना असलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यावरुनच भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी खळबळजनक विधान केले आहे. आपल्याला पोलीस सुरक्षा मिळावी म्हणून एकनाथ खडसे त्यांच्या सुरक्षारक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे, असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यातच गाड्यांचा ताफा, पोलिसांना मागे फिरवून आपण किती व्हीआयपी आहोत, असं खडसे दाखवायचे असंही भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलंय आहे.

पोलीस ठाण्यात १८ तास ठिय्या आंदोलन..

जळगाव जिल्हा दूध संघात अधिकाऱ्यांच्या पातळीवर कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी खडसेंनी केली होती. त्यासाठी एकनाथ खडसे यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन केलं. पण त्यांची मागणी मान्य झाली नाही. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी खडसेंनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं होतं. हे आंदोलन जवळपास १८ तास चाललं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत खडसेंना आंदोलन मागे घेण्यास सांगितलं.

रेकॉर्डमध्ये खाडाखोड…

जळगाव जिल्हा दूध संघातील उत्पादनाच्या साठ्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याने दररोज किती उत्पादन साठा हा शिल्लक आहे याचा अहवाल हा व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवावा लागतो. त्यावरून साठ्याबाबत तपासणी केली जाते, तसंच इंटरनल ऑडिटर देखील यामध्ये तपास करतो. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साठ्याबाबत अहवाल सादर होतो, मात्र रेकॉर्डमध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आलं आहे. दुग्धजन्य पदार्थाचा साठा हा गोडाऊनच्या बाहेर न जाता कागदोपत्री दाखवून अंदाजे सव्वा कोटीच्यावर गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे. तपास केल्यास हा गैरव्यवहार सव्वा कोटीच्या वरही जाण्याची शक्यता, एकनाथ खडसेंनी वर्तवली आहे. त्यामुळे याबाबत दूध संघाच्या व्यवस्थापकांना संशयीतांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

Back to top button