जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार | पुढारी

जिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुलांची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे आता काहीच कामाचे न राहिलेले दप्तर जिल्हा परिषदेला जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर भगवान मधे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढत अनोखे आंदोलन केले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देण्यासाठी तत्काळ शिक्षक नेमण्याचे आदेश तसेच शाळेच्या बांधकामासाठी लवकरच सर्वंकष प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी सांगितले आहे.

भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावातील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा बंद केल्याने येथील विद्यार्थांना इतरत्र शाळेत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इगतपुरी गटशिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचे पत्र दिल्यापासून शाळा बंदच आहे. शाळा नसल्याने व नुकसान होऊ नये म्हणून श्रमजीवी संघटनेच्या वतीने स्थानिक गटशिक्षण अधिकारी कार्यालयात शाळा भरवून अनोखे आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही शाळा बंद करण्यावर प्रशासन ठाम असल्याने विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला आहे.

मोर्चानंतर आंदोलक पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आमिशा मित्तल यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भेट नाकारली त्यामुळे आंदोलक पालकांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर कनोज यांची भेट घेत आपबिती कथन केली आणि निवेदन दिले. यावेळी गटशिक्षण अधिकारी नीलेश पाटील, विस्तार अधिकारी कैलास सांगळे, केंद्रप्रमुख माधव उगले आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तत्काळ एक शिक्षक नेमण्याचे आदेश दिले आहे. शाळा बांधणीच्या मागणीबाबत नियम निकषांनुसार सर्वंकष प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात येईल, मंजुरी मिळाल्यास लगेच कार्यवाही करण्यात येईल. मोर्चाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात येणार आहे. – भास्कर कनोज, शिक्षणाधिकारी (प्राथमिक).

हेही वाचा:

Back to top button