धुळे: कौटुंबिक सर्वेक्षणात महिलांबाबत चुकीची माहिती; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : जयश्री अहिरराव | पुढारी

धुळे: कौटुंबिक सर्वेक्षणात महिलांबाबत चुकीची माहिती; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार : जयश्री अहिरराव

धुळे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण अभियानाच्या राज्याच्या अहवालात चूक झाली आहे. डाटा एन्ट्री करताना कॉलम चुकल्याने धुळे जिल्ह्यातील महिलांबाबत चुकीचे चित्र निर्माण झाले. महिलांची बदनामी झाली. त्यामुळे संबंधितांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव यांनी दिली. भाजप महिला मोर्चाने आज (दि.२४) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

जयश्री अहिरराव म्हणाल्या की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर धुळे जिल्ह्यातील महिला सर्वाधिक मद्यपी, अशा बातम्या प्रसारित झाल्या. मात्र, वस्तुस्थिती तशी नसताना आकडे चक्रावून टाकणारे होते. त्यामुळे घाईगडबडीत निवेदन न देता मी अभ्यास केला. संबंधितांशी बोलले, त्यानंतर राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण अभियानाच्या इंटरनेटवरील सर्व्हेचाही अभ्यास केला आणि त्यातून चूक कोठे झाली हे लक्षात आले. राज्याचा अहवाल छापला जात असताना एक कॉलम कमी झाला. त्यातून आकडे वर खाली गेले आणि मद्यपी महिलांचा आकडा फुगला. मद्यपी महिलांचे प्रमाण अवघे 0.5 टक्के आहे.

अहवालात चूक झाली असून यात दुरुस्त करण्यासाठी आम्ही संबंधितांना पत्र देणार आहोत. राज्याचा अहवाल केंद्राकडे जाण्याआधीच ही चूक दुरुस्त करण्याचा आमचा आग्रह राहील. माध्यमात बातम्या आल्या, त्यामुळे माध्यमांची चूक झाली, असे म्हणता येणार नाही. त्यांनी अहवालाच्या आधारेच बातमी दिली आहे. मात्र, अहवाल वेबसाईटवर टाकला जात असताना डाटा एन्ट्री करणार्‍याने चूक केली, त्यातून हे घडले. त्यांच्या चुकीचा फटका धुळे जिल्ह्यातील महिलांना बसला आहे. महिलांची बदनामी झाली आहे, त्यामुळे संबंधितांविरूद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या निर्णयाप्रत आम्ही आलो आहेत.

याबाबत जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याशी बोलून याबाबतचा निर्णय घेतला जाईल. धुळे जिल्हा हा संस्कारित महिलांचा आहे. येथे मानसन्मान मानणार्‍या महिला राहतात. त्यामुळेच गेले तीन दिवस अभ्यास करुन चूक कुठे झाली हे शोधले. राष्ट्रवादीने निवेदन देऊन केवळ राजकारण केले. अपुर्‍या माहितीच्या आधारावर राजकीय हेतूने प्रेरित राष्ट्रवादीचे आंदोलन असल्याचा आरोपही श्रीमती अहिरराव यांनी केला.

माफी मागा, अन्यथा आंदोलन

धुळे जिल्ह्यातील महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह असा हा अहवाल म्हणावा लागेल. मद्यपी महिलांचे प्रमाण 38.2 टक्के इतके दाखविले आहे. म्हणजेच पाचपैकी तीन घरांतील महिला मद्यप्राशन करतात, असे त्यांना म्हणायचे आहे. त्यामुळे संबंधितांनी महिलांची माफी मागावी, त्यांना निलंबित करावे, अशी मागणी भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी यांनी केली.

पत्रकार परिषदेला बेटी बचावच्या संयोजिका अल्पा अग्रवाल, जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती आरती पवार, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसेविका प्रतिभा चौधरी, ज्येष्ठ नेते महादेव परदेशी, अरुण पवार, यशवंत येवलेकर, मयूर सूर्यवंशी, सचिन शेवतकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button