हो मी अनेकांना चुना लावला, विरोधकांच्या टीकेवर एकनाथ खडसेंचा पलटवार | पुढारी

हो मी अनेकांना चुना लावला, विरोधकांच्या टीकेवर एकनाथ खडसेंचा पलटवार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेतली. यात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आ. एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता आ. खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कालच्या सभेत मुक्ताईनगर तालुक्याला काहीतरी विकासाचं मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ही सभा केवळ आणि केवळ या नाथाभाऊ विरुद्ध गरळ ओकण्यासाठीच असल्याचे खडसे यांनी सांगितले.

गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर चुना लावण्याची टीका केली होती. आपल्यावरील टीकेवर पलटवार करताना आ. खडसे म्हणाले, हो मी अनेकांना चुना लावला, मी भ्रष्ट्राचार आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलपर्यंत पाठवलं. यात जे प्रामाणिक होते, त्यांना माझी भीती वाटली नाही, जे नव्हते त्यांना माझी भीती वाटली. मी कुणाला बुडवलं, फसवलं नाही. मी माझ्या बापजाद्यांपासून श्रीमंत आहे. माझ्या आईवडिलांपासून माझी आर्थिक स्थिती चांगली आहे. मी कोणत्या टपरीटुपरीवर काम करणारा नव्हतो, त्यामुळे मला कुणाला चुना लावण्याची गरज भासली नाही, जे आहे ते माझ्याकडे वडलोपार्जित आहे.

हे माझ्या चपला उचलायचे…

गिरीश महाजन यांना मुद्दाम एकनाथराव खडसे यांना विरोध करण्यासाठी मोठं केल जात आहे. आत्ता आत्ता त्याचं नाव मोठं झालं आहे. आधी हे सर्व लोक माझ्या चपला उचलायचे. माझे पाय दाबायचे. तेव्हाचे दिवस हे विसरले आहेत. यांना सत्तेचा माज आला आहे, असेही एकनाथराव खडसे म्हणाले.

काय म्हणाले होते गिरीश महाजन…

मंत्री गिरीश महाजन यांनी सभेत एकनाथ खडसे यांचे नाव न घेता टीका केली होती. मुक्ताईनगरातील नेत्यांना मोठा गर्व असून, हा गर्व कधीही टीकत नसतो. रावण, दुर्योधन, नरकासूर यांचा गर्व टीकला नाही तर यांचा काय टीकेल अशा शब्दात महाजनांनी खडसेंवर टीकास्त्र सोडले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी न घाबरता काम करण्याची गरज असून, आता राज्यात आपले सरकार आहे. आपली वेळ आली असल्याचे सांगत आता कोणाची दादागिरी चालणार नाही ,असे सांगत खडसेंना टोला लगावला होता.

Back to top button