नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मनमाड येथे नुकसानीची पाहणी | पुढारी

नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मनमाड येथे नुकसानीची पाहणी

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शहरात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी सोमवारी (दि. 19) नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ज्यांचे नुकसान झाले, त्यांची भेट घेऊन, सरकार तुमच्या पाठीशी असून सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, तहसीलदार, कृषी अधिकारी, बीडीओ, पालिकेचे मुख्याधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याची सूचना आमदार कांदे यांनी केली.

गुरुद्वारामध्ये आश्रय घेतलेल्यांसाठी धान्य, तेल, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू आ. कांदे यांच्या वतीने देण्यात आल्या. ज्यांच्या संसारोपयोगी वस्तू पुरात वाहून गेल्या, त्यांना शिवसेनेतर्फे तातडीची मदतही देण्यात येणार असल्याचे आ. कांदे यांनी जाहीर केले. शिवाजीनगर पुलाची उंची कमी असल्याने पाणी तुंबते, त्यामुळे नवीन पुलासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून, त्याची निविदादेखील प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आ. कांदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, बीडीओ चौधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, पालिकेचे मुख्यधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, पीडब्ल्यूडीचे अधिकारी खैरनार, सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. गोरे, किरण पाटील यांच्यासह अंजुम कांदे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, राजेंद्र भाबड, सुनील हांडगे, फरहान खान, गुलाब भाबड, किरण देवरे, गालिब शेख, अमीन पटेल आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button