नाशिक : सोनजांब येथे शेतकऱ्यावर केला बिबट्याने हल्ला | पुढारी

नाशिक : सोनजांब येथे शेतकऱ्यावर केला बिबट्याने हल्ला

नाशिक (दिंडोरी): पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील शेतकरी बाकेराव हरी जाधव (६०) हे शेतातील विहिरीकडे घरातील पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करावयास जात असताना अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये जाधव यांच्या मानेला, गळ्याला तसेच पायाला मोठ्या प्रमाणात गंभीर जखमा झाल्या आहेत.

जाधव यांनी बिबट्याचा जोरदार प्रतिकार केला. तसेच आरडाओरड केल्याने परिसरातील इतर शेतकरी त्वरित घटनास्थळी धावत आल्याने जाधव यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. मात्र या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यांना जवळच्या खेडगाव येथे उपचारासाठी आणले आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोनजांब, जवळके वणी, गोंडेगाव परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणत वावर वाढला आहे. बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी – कुत्रे, शेळ्या बिबट्यांनी फस्त केल्या आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही परिसरात पिंजरा लावण्याची तसदी वनविभागाने घेतलेली नाही. शेतकऱ्यांवर होणाऱ्या जिवघेण्या हल्ल्यामुळे वनविभाग शेतकरी वर्गाची बिबट्याची शिकार होण्याची वाट बघत आहे की काय? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे  लवकरात लवकर परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button