नाशिक : सातपूरच्या निगळ मळ्यातील नगरसेवकांसह पोलीस प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी | पुढारी

नाशिक : सातपूरच्या निगळ मळ्यातील नगरसेवकांसह पोलीस प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

गत आठवड्यात गुरुवारी सायंकाळी शहरात तीन तास प्रचंड वेगाने कोसळलेल्या पावसाच्या रौद्रावतारामुळे ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन सातपूर औद्योगिक वसाहतीलगतच्या सोमेश्वर काॅलनीतील निगळ मळा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात निगळ कुटुंबीयांच्या घरासमोरील महिंद्रा कंपनीच्या गोडाऊनची संरक्षक भिंतच पुराच्या पाण्याने कोसळल्याने निगळ मळ्यातील 40 ते 50 कुटुंबीयांच्या घरातील संसार तसेच दुचाकी वाहून गेल्या. तर सौरभ निगळ यांचा लाखोंचा डीजे सेट वाहून गेला. या नुकसानीची स्थानिक नगरसेवक तसेच पोलीस प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली.

महिंद्राच्या गोडाऊन लगतच निगळ कुटुंबीयाचे शेत, राहते घर, तसेच भाडेकरूंची ४०- ५० घरे आहेत. गोडाऊनच्या रिकाम्या जागेत प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी साचले आणि पाण्याचा भार सहन न झाल्याने रात्री आठच्या सुमारास गोडाऊनची संरक्षक भिंत कोसळून पाण्याच्या लोंढ्यासह दगडही घरात घुसले. निगळ मळ्यातील भाडेकरूंच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे 40 ते 50 कुटुंबीयांचे प्रचंड नुकसान झाल्याचे विदारक चित्र दिसून आले. या घटनेनंतर नगरसेवक विलास शिंदे, सलीम शेख, नयना गांगुर्डे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीला नाशिक महापालिकेचे नगररचना विभाग जबाबदार असून, शहरातील अनेक नैसर्गिक नाले बुजविले गेल्याने हा प्रसंग घडल्याचा दावा सलीम शेख यांनी केला आहे. दरम्यान, या नागरिकांना भरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांसह नगरसेविका नयना गांगुर्डे, नगरसेवक विलास शिंदे यांनी केली आहे. तसेच पोलिस प्रशासनानेदेखील दखल घेत पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.

मदतीसाठी प्रयत्न करण्याचे दोंदे यांचे आश्वासन

महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय समितीचे पवन दोंदे, विनोद मांडवे आदींनी झालेल्या नुकसानीविषयी पाहणी करून माहिती घेतली. दुर्घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवून पुरेपूर मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पवन दोंदे यांनी दुर्घटनाग्रस्त निगळ कुटुंबीयांना सांगितले.

हेही वाचा:

Back to top button