नाशिक : धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या कारच्या काचा फोडून चोरी | पुढारी

नाशिक : धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या कारच्या काचा फोडून चोरी

नाशिक, इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील भावली धरणाजवळ धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी नाशिकहून कुटुंबासह आलेल्या पर्यटकाच्या कारच्या काचा फाेडून चोरटयांनी त्यात असलेले दोन मंगळसूत्र आणि तीन मोबाइल सुमारे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काठे गल्लीतील मयूर देवळे (३२) हे शनिवारी (दि. 10) पत्नी, सासूसह भावली धरणाच्या परिसरात धबधबा पाहण्यासाठी आले होते. त्यांनी आपली कार भावली धरणासमोरील महामार्गालगत उभी केली आणि त्यात सहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र तसेच तीन मोबाइल ठेवत ते धबधबा पाहण्यास गेले होते. धबधबा पाहून परत कारजवळ येताच कारच्या काचा फोडुन आत असलेल्या त्यांच्या सर्व वस्तू चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. देवळे यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. जाधव व पोलिस पथक करीत आहेत.

भावली परिसरात पर्यटकांना व पर्यटक महिलांना सुरक्षा नसून स्थानिक युवकांकडून लूटमार व मारझोड तसेच शिवीगाळ करून पर्यटकांना त्रास दिला जातो.

— कमल नाथानी, पर्यटक, मुंबई

हेही वाचा :

Back to top button