नाशिक : पालकमंत्री पदाच्या मुहूर्तावर ना. महाजनांचे मौन | पुढारी

नाशिक : पालकमंत्री पदाच्या मुहूर्तावर ना. महाजनांचे मौन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. परंतु, सरकारकडून अजूनही पालकमंत्रिपद वेटिंगवर असल्याने या पदांचे वाटप कधी होणार, याकडे इच्छुक मंत्र्यांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे. पालकमंत्री पदाला मुहूर्त लवकरच लागणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. ना. गिरीश महाजन यांनीही, लवकरच पालकमंत्री पदाचे वाटप होणार असले, तरी त्याच्या मुहूर्ताबाबत मात्र त्यांनी मौन बाळगत, लवकरच पालकमंत्री मिळेल, असे सांगितले.

दरम्यान, माजी पालकमंत्री राहिलेल्या ना. गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत हजेरी लावत, आपणच नाशिकचे पालकमंत्री असण्यावर पुन्हा एकदा दावा केला आहे. याआधीही पालकमंत्री असताना ना. महाजन यांनी गणेशोत्सवासह इतरही सण-उत्सवांत हजेरी लावत लेजीम तसेच ढोल पथकावर ताल धरला होता. त्याच अविर्भावात ना. महाजन यांनी यंदाही हजेरी लावल्याने त्यांच्या पालकमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. नाशिक येथील विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना पालकमंत्री पदाबाबत विचारले असता, फार काळ वाट पाहावी लागणार नाही, असे सांगत, आपण मुहूर्त सांगत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यांना निधी वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे पालकमंत्रीही लवकरच मिळतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भाजपच्या मिशन बारामती आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बारामती दौर्‍याबाबत विचारले असता, ना. महाजन म्हणाले की, लोकसभेच्या पराभव झालेल्या जागेवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे केवळ बारामतीच नव्हे, तर सर्वच अशा जागांवर लक्ष असून, सर्वच जागा विजयी करण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. देशातील जनता पुन्हा एकदा भाजपला कौल देईल, असा विश्वास व्यक्त करत, पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत लवकरच संबंधितांना मदत दिली जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button