जळगाव शहरात खेळणी विकणाऱ्या महिलेच्या चारवर्षीय बालकाचे अपहरण | पुढारी

जळगाव शहरात खेळणी विकणाऱ्या महिलेच्या चारवर्षीय बालकाचे अपहरण

जळगाव : सध्या गणेशोत्सवामुळे महापालिकेच्या आवारात खेळण्यांची दुकाने लागली आहेत. याठिकाणी खेळणी विकणाऱ्या एका महिलेच्या ४ वर्षीय बालकाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या आवारात किरकोळ खेळणी व फुगे विक्रेत्यांनी दुकाने लावलेली आहेत. दरम्यान, कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील महिला शबाना सलमान चव्हाण यांनीदेखील फुगे विक्रीचे दुकान लावलेले आहे. या महिलेसोबत तिचा ४ वर्षाचा मुलगा आयुषदेखील होता. रविवारी सायंकाळी महिला महापालिकेच्या जवळील गल्लीत फुगे विक्री करत असताना तिच्या नातेवाइकाच्या मुलासोबत तिचा मुलगा आयुषदेखील खेळत होता. मात्र, संबंधित महिला परतल्यानंतर तिला आयुष दिसून आला नाही. यापूर्वी शबाना चव्हाण यांचा नातेवाईक नितीन लाला भोसले यांच्याशी दुकान लावण्याच्या जागेवरून वाद झाला होता. त्यानेच मुलाचे अपहरण केल्याची तक्रार शबाना चव्हाण यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन भोसले (रा. कोपरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button