

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा
सातपूर- त्र्यंबकेश्वर रोडवर भरधाव कारच्या धडकेत 25 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याच ठिकाणी महिनाभरापूर्वी अशीच घटना घडली होती. वाहतूक सुरक्षाव्यवस्था नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघातांचे प्रकार घडत आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम वासुडकर हा युवक सातपूर औद्योगिक वसाहतील टपारिया टूल्स या खासगी कंपनीत काम करत होता. रविवारी (दि.4) रात्री 11.30 च्या सुमारास सेकंड शिफ्ट सुटल्यावर दुचाकीने (क्र. एमएच 15, डीडी 4509) तो सिडकोच्या दिशेने घरी जात होता. त्यावेळी त्र्यंबक रोडवरून सातपूरकडे भरधाव येणार्या कारने (क्र. एम एच 15, एचजी 5762) शुभमच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात तो गंभीर जखमी झाला होता. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाला. शुभम हा एक महिन्यापूर्वी टपारिया टूल्स कंपनीत रुजू झाला होता. मनमिळाऊ व मेहनती असलेल्या शुभमच्या पश्चात आई असून, तो एकुलता एक आधार असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सहायक उपनिरीक्षक आरिफ सय्यद तपास करत आहेत.