नंदुरबार : अल्पवयीन मुलाची पोलिसांकडून सुटका | पुढारी

नंदुरबार : अल्पवयीन मुलाची पोलिसांकडून सुटका

नंदुरबार , पुढारी वृत्तसेवा : ५० हजार रुपये दिल्याच्या मोबदल्यात चक्क सहा वर्षीय मुलाला ताब्यात ठेवून मेंढ्या चारण्यासाठी कामाला लावण्याचा हीन प्रकार नंदुरबार पोलिसांनी उघडकीस आणला. पन्नास हजार रुपयात मुलाची विक्री केल्याचा आरोप ठेवून संबंधित दोन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना दि. ४ ऑगस्ट रोजी याविषयी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. म्हणून त्यांनी ताबडतोब दखल घेऊन तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने मेंढपाळ व्यावसायीकाचा व अल्पवयीन बालकाचा शोध घेतला असता परिवहन कार्यालयासमोर असलेल्या कोळसा डेपोजवळ काही मेंढपाळ असून त्यांच्यासोबत एक अल्पवयीन बालक देखील आहे, अशी माहिती त्यांना प्राप्त झाली.

यानंतर पोलिसांनी पथकासह तात्काळ कोळसा डेपोजवळ धाव घेतली. एक बालक काही मेंढ्यांना चारा घालत असतांना दिसून आल्याने पोलीसांनी त्यास जवळ घेवून विचारपूस केली. त्यावेळेस त्या अल्पवयीन बालकाने सांगितले की, तो मुळचा मध्यप्रदेश राज्यातील राहणारा असून त्याचा नातेवाईक मारुती याने त्यास ठेलारीकडे चारण्यासाठी दिलेले आहे.

त्यावरून आरोपी मेंढपाळ गुंडा नांगो ठेलारी (वय ४५ रा. भोणे ता. जि. नंदुरबार) यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता हे प्रकरण उघडकीस आले. मारुती सोक्कर (वय २० रा. गारबडी ता.जि. बुऱ्हाणपूर मध्य प्रदेश) या इसमाने ५० हजार रुपये घेवून खातला फाटा ता. जि. बऱ्हाणपूर येथील त्याच्या नातेवाईकाच्या अल्पवयीन मुलाला मेंढ्या चारण्यासाठी दिलेले आहे. त्याअनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात रवाना केले.

पोलीसांच्या पथकाने गारवर्डी जि. बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथून मारोती रामा सोनकर  यास ताब्यात घेवून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर मुलास ५० हजार रुपयांत मेंढपाळ व्यवसायीकाला दिले असल्याचे कबुल केले. यानंतर त्यास अटक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ६ वर्षीय अल्पवयीन बालकाला बाल कल्याण मंडळासमोर हजर करून त्याचे पुर्नवसन करण्यात आले असून अल्पवयीन बालकास त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button