जळगाव : रेल्वेमुळे केळी उत्पादकांना 45 लाखांचा फटका | पुढारी

जळगाव : रेल्वेमुळे केळी उत्पादकांना 45 लाखांचा फटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
दिल्लीला केळी पाठविण्यासाठी रेल्वेने वेळेवर वॅगन्स उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी त्या तेथे पोहोचण्यात तब्बल पाच ते सहा दिवसांचा काळ लागत असल्याने केळी उत्पादक शेतकर्‍यांची केळी रस्त्यातच खराब होत असून, शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

आठ वर्षांच्या खंडानंतर सावदा रेल्वेस्थानकातून केळी वाहतूक सुरू झाली. सुरुवातीला किसान एक्स्प्रेसद्वारे ही केळी दिल्लीला आदर्शनगरला पोहोचत होती. नंतर कोळशाचे कारण पुढे करीत अनुदानित किसान एक्स्प्रेस रेल्वे विभागाकडून बंद करण्यात आली. शेतकर्‍यांनी पूर्ण भाडे देऊ केल्यानंतर शेतकर्‍यांना व्हीपीएन वॅगन्स व बीसीएन वॅगन्स उपलब्ध होऊ लागल्या. मात्र, रेल्वे विभागाकडून वेळेचे कोणतेही बंधन पाळले जात नसल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून होत आहे. आत्ताच्या तीन रॅकमध्ये शेतकर्‍यांचे सुमारे 45 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी वॅगन्स वेळेवर न मिळत असल्याने 24 तास केळी तशीच सावदा रेल्वेस्थानकात पडून राहिल्याने शेतकर्‍यांना लाखोंच्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. 19, 26 व 30 ऑगस्टला सावदा रेल्वेस्थानक येथून दिल्लीतील आदर्शनगरला बीसीएन वॅगन्समध्ये केळी भरण्यात आली. तिसर्‍या दिवशी ही केळी दिल्लीला पोहोचणे अपेक्षित असते. परंतु रेल्वेच्या गलथान कारभारामुळे ही केळी पाचव्या दिवशी दुपारी 2 ला पोहोचली. मात्र, केळी खरेदी करणारे व्यापारी घरी निघून गेले होते. त्यामुळे नंतर दिल्लीतील व्यापार्‍यांनी 100 ते 200 रुपये कमी दराने मागणी केली. त्यामुळे प्रतिक्विंटल 100 ते 200 रुपये नुकसान झाल्याने एका रॅकमागे 15 लाखांचे असे तीन रॅकमागे 45 लाखांचे नुकसान झाले.

रेल्वे मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव
दिल्लीसाठी केळी भरल्यानंतर भुसावळमधून गाडी खंडव्यापर्यंत वेळेत जाते. मात्र, पुढे इटारसी व झाशी विभागात प्रवेश केल्यानंतर केळीने भरलेली गाडी ही आउटरला तासन्तास थांबवून ठेवली जात असल्याने गाडी दिल्लीत पोहोचण्यास उशीर होत आहे.

हेही वाचा:

Back to top button