जळगाव : पक्षातील फाटफुटीमुळे जिल्हाप्रमुखांच्या घरासमोरच शिवसैनिकांचे आंदोलन | पुढारी

जळगाव : पक्षातील फाटफुटीमुळे जिल्हाप्रमुखांच्या घरासमोरच शिवसैनिकांचे आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना नेतृत्वहीन झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षाची मोठी वाताहात झाली असून, शिवसेनेकडून मनुष्यबळासाठी नव्याने मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार जिल्ह्यात नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, या नियुक्त्यांवरून आता उरलेल्या शिवसेनेतही फूट पडली असून शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या घरासमोर ठिय्या दिला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आता स्थानिक पातळीवरही बदलाचे वातावरण असून त्या अनुशंगाने जळगाव जिल्हाप्रमुख यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. परंतु, भुसावळ तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांना या नियुक्त्या मान्य नाही. जळगाव जिल्हाप्रमुखांनी केलेल्या पदाधिकारी नियुक्त्या मान्य नसल्याचे म्हणत भुसावळ तालुक्यातील शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या घरासमोर ठिय्या दिला आहे. शिवसेनेतर्फे जाहीर झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत उपऱ्यांना मानाची स्थाने तर निष्ठावंतांच्या पदरी धोंडे पडल्याचा आरोप करत, जिल्हा प्रमुखांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना…
पक्षात नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवख्यांना पदे दिली. गेल्या ४० वर्षापासून शिवसेना कार्यकर्ते आहेत. परंतु आमचा विचार केला जात नाही नवीन येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. नियुक्त्या करतांना त्याने पक्षासाठी दिलेले योगदान, एकनिष्ठता याचाही अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. याबाबत पक्षाकडे तक्रार करणार असल्याचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी सांगितले. तर भुसावळ तालुक्यातील शिवसैनिक हे संघटनेच्या वरिष्ठांना वेठीस धरण्याचा काम करत असून शिवसैनिकांनी केलेले कृत्य हे निषेधार्ह असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

Back to top button