नाशिकमध्ये दुचाकीस्वाराची स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल : पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष | पुढारी

नाशिकमध्ये दुचाकीस्वाराची स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल : पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात एकीकडे वाहतुकीचा खोळंबा होत असताना वर्दळीच्या रस्त्यावर युवकाने दुचाकीवर स्टंट केल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीसमोरील मार्गावर हा स्टंट झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून, वाहतूक पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.

शहरात वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बेशिस्त वाहतुकीत वाढ झाली आहे. ट्रिपल सीट, रॅश ड्रायव्हिंग, सिग्नल मोडणे, विरुद्ध बाजूने दुचाकी चालविणे, वाहन क्रमांक प्लेट चुकीच्या पद्धतीने लावणे, चारचाकी वाहनांना काळ्या फिल्म लावणे, मोबाइलवर बोलताना वाहने चालविणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. काही बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखा कारवाई करते. मात्र, कारवाईचा धाक नसल्यागत अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडण्यात धन्यता मानतात. याआधी वर्दळीच्या रस्त्यावर स्टंटबाजी करताना कोणी दिसत नव्हते. कॉलनी रोड किंवा निर्मनुष्य मार्गांवर स्टंट केले जात होते. त्यांच्याविरुद्ध तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांनी कारवाई केल्याने त्यावर काहीसा अंकुश आला होता. आता महाराष्ट्र पोलिस अकादमीसमोरील रस्त्यावर दुचाकीस्वाराने स्टंट केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

हा व्हिडिओ रविवारी (दि. 28) व्हायरल झाला. परंतु, हा स्टंट नेमका केव्हा झाला, हे अद्याप समजलेले नाही. वाहतूक शाखा संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेत आहे. अशा स्टंटबाजीमुळे स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणार्‍या अशा वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button