नाशिक : शिंदवडला बिबट्याने पाडला वासराचा फडशा | पुढारी

नाशिक : शिंदवडला बिबट्याने पाडला वासराचा फडशा

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा 
दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार झाल्याची घटना घडली आहे. शिंदवड व परिसरात मागील महिनाभरापासून बिबट्याचे दर्शन होत असून बिबट्या व त्याची दोन पिल्ले यांचा याठिकाणी वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या बिबट्याने महिनाभरात अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला असून बिबट्याने आता पशुधनास लक्ष केले आहे.

अधिक माहिती अशी की, येथील मोरे कुटंबीय दिवसभर शेतातील कामे करुन झोपले होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या मळ्यात गायींचा जोरजोरात हंबरण्याचा आवाज आला व हालचाली जाणवल्याने अशोक मोरे, भाऊसाहेब मोरे, नामदेव मोरे यांनी तिकडे धाव घेतली. तिथे बिबट्या एका वासराचा पाय धरुन होता, हे बघताच जोरात आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने जवळच्या डोंगरात धूम ठोकली. पण, या जखमी वासरावर पुन्हा रात्री बिबट्याने हल्ला करत जंगलात ओढून नेले. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावाच्या उत्तरेला डोंगर असून या ठिकाणी गायी चारण्यासाठी शेतकरी जात असतात तसेच रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी शेतात असतात. पण बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. बिबट्या पकडण्याची मागणी शिंदवड ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी उपसरपंच सोपान बस्ते, ग्रा. प. सदस्य अमोल बरकले, पोलिस पाटील सुदाम गाडे आदींनी घटनास्थळी पाहणी केली असून लवकरच वनविभागाला पिंजरा लावण्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा ;

Back to top button