नाशिक : दोघा दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या ; ६ दुचाकी जप्त | पुढारी

नाशिक : दोघा दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या ; ६ दुचाकी जप्त

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिलेल्या आदेशांनुसार, पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव व अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली. अधिक चौकशीत या संशयितांनी देवळाली कॅम्पसह पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून पोलिसांनी ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात सुनीलकुमार रघुनाथ विश्वकर्मा (रा . संसरीगाव, नाशिक) यांची दुचाकी चोरी झाल्याबाबत दि. ४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने देवळाली कॅम्पचे गुन्हे शोध पथक तपास करीत असताना या पथकातील पोलिस नाईक राहुल बलकवडे यांना माहिती मिळाली की, भगूर येथे दोघे जण चोरीची दुचाकी विकण्यास आले आहेत. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन नाधव यांना कळविली व त्यांच्या आदेशावरून गुन्हे शोध पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता, आकाश पांडुरंग आंबेकर (२६, रा. मांगीर बाबासमोर, नांदूर नाका) आणि वैभव शिवाजी तौर (१९ रा. वृंदावननगर, नांदूर नाका) हे दोघे एका दुचाकीसह सापडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाल्याने दोन्ही संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयितांकडून एकूण ६ दुचाकी हस्तगत केल्या. त्यामध्ये म्हसरूळ पोलिस ठाण्याकडील २, पंचवटीकडील २ व आडगावकडील १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदेश पाडवी, पोलिस हवालदार सुनील जगदाळे, हवालदार राजेंद्र गुंजाळ, रमाकांत सिद्धपुरे, नाईक राहुल बलकवडे, शिपाई एकनाथ बागूल, नितीन करवंदे, ताजकुमार लोणारे यांचा समावेश होता.

हेही वाचा :

Back to top button