नाशिक : बाह्यशक्ती म्हणणार्‍यांना धुळ्याचे खासदार कसे चालतात?- अ‍ॅड. ठाकरे यांचा सवाल; निफाड तालुक्यात परिवर्तन पॅनलचा प्रचार | पुढारी

नाशिक : बाह्यशक्ती म्हणणार्‍यांना धुळ्याचे खासदार कसे चालतात?- अ‍ॅड. ठाकरे यांचा सवाल; निफाड तालुक्यात परिवर्तन पॅनलचा प्रचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून विद्यमान सरचिटणीस यांनी कधी नव्हे इतक्या वेळेस बाह्यशक्ती या शब्दाचा वारंवार उल्लेख केला. त्या आता शरद पवारांना बाह्यशक्ती म्हणून संबोधत असल्याचे कळल्यानंतर मूळ धुळ्याचे असलेले खासदार सुभाष भामरे त्यांच्या व्यासपीठावर कसे चालतात? असा सवाल परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केला.

निफाड तालुक्यातील परिवर्तन पॅनलच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर विश्वासराव मोरे, देवराम मोगल, शिवाजी गडाख, माणिकराव कोकाटे, बाळासाहेब क्षीरसागर, नंदकुमार बनकर, संदीप गुळवे, लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, शोभा बोरस्ते, शालन सोनवणे आदी उपस्थित होते. डॉ. वसंत पवार यांनी हयात असताना कधीच शरद पवारांची आणि सत्यशोधक विचारसरणीची साथ सोडली नाही. मात्र, त्यांच्या पश्चात सोयीच्या राजकारणासाठी विचारांना गुंडाळल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले.

प्रत्येक वेळी सभासदांना वेठीस धरायचे आणि निवडणुकीत विकत घेण्याची भाषा करायची, हे त्यांचे गणित स्वाभिमानी सभासदांनी ओळखल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले. तर बाळासाहेब क्षीरसागर यांनी विद्यमान सभापती माणिकराव बोरस्ते यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. दरम्यान, परिवर्तन पॅनलचा निफाड तालुका दौरा गुरुवारी (दि.25) झाला. या दौर्‍यात कोकणगाव, साकोरे मिग, पिंपळगाव बसवंत, शिरवाडे वणी, पालखेड, रानवड, सारोळे, वनसगाव, उगाव येथे प्रचार सभा झाल्या. यावेळी सुभाष गायकवाड, केशव मोरे, गोटीराम मोरे, शिवाजी गायकवाड, सतीश बोरस्ते, नानासाहेब बोरस्ते, सुखदेव बोरस्ते, अशोक माळोदे, संपतराव मोरे, अशोक मोरे, संदीप कोल्हे, रवींद्र मोरे, साहेबराव देशमाने, रामकृष्ण तिडके आदी उपस्थित होते.

रुग्णालयाच्या कारभारात हस्तक्षेप : कोकाटे
सध्याच्या कार्यकारिणीत पाच डॉक्टर, तर कोविडच्या बिकट काळात संस्थेच्या रुग्णालयात सरचिटणीसांच्या आर्किटेक्ट कन्येचा हस्तक्षेप होता. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीच उपस्थित राहणे क्रमप्राप्त असताना संबंधित कन्येची उपस्थिती सर्वांनाच खटकणारी होती, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button