नाशिक: … अन् पाटातील कचर्‍याच्या स्वच्छतेला मुहूर्त, मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह पथकाची धाव

नाशिक: … अन् पाटातील कचर्‍याच्या स्वच्छतेला मुहूर्त, मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह पथकाची धाव
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद रोड, पेठ रोड आणि दिंडोरी रोड ओलांडून जाणार्‍या डाव्या कालव्यात (पाटात) साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचर्‍यासंदर्भात दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच मनपाच्या आरोग्य विभागाने तातडीने पाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रोगप्रतिबंधक औषध फवारणी केली. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ही मोहीम नियमित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने पंचवटीतील पाटामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले असून, त्यात कचरा सडला, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कापड मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा उपद्रव वाढला होता. पाटावरून ये-जा करणार्‍या आणि पाटालगत राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात दै. 'पुढारी'ने बुधवारी (दि.24) 'पाटातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा पंचवटीकरांना धोका' या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. वृत्त प्रसिद्ध होताच बुधवारी (दि.24) सकाळी मनपाच्या पंचवटी आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन व मलेरिया या विभागांनी पाटालगत मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड ते हिरावाडी रोड या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली व संपूर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी करून कचरा गोळा करून घेण्यात आला. पाट परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कागद, कापड, निर्माल्य अशा प्रकारचा कचरा गोळा करून घंटागाडीद्वारे उचलून नेण्यात आला. मलेरिया विभागामार्फत पाटात साचलेल्या पाण्यात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचार्‍यांकडून रस्ते परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, किरण मारू, विलास साळवे, मलेरिया विभागाचे कैलास पांगारकर यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य व मलेरिया या तिन्ही विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोहिमेत सातत्य हवे
पेठ रोड कॅनॉलमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य समस्यांना सतत सामोरे जावे लागते. शहरात सर्वात जास्त साथीच्या आजारांचा फैलाव येथूनच होतो. महापालिका व पाटबंधारे विभागाने याची जबाबदारी एकमेकांवर न ढकलता संयुक्तरीत्या मोहीम राबवावी व कडक पावले उचलावी जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. तसेच ही मोहीम तात्पुरती राबवून थांबू नये या मोहिमेत सातत्य ठेवावे.
– सुनील केदार, सरचिटणीस, भाजप, नाशिक

मनपा अधिकार्‍यांशी संयुक्त बैठक घेणार
डाव्या कालव्यातील स्वच्छतेबाबत लवकरच नाशिक महापालिकेचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी यांची संयुक्तीक बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत पाटाच्या कायमस्वरूपी स्वच्छतेबाबत निर्णय घेतला जाईल. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.
– सागर शिंदे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news