नाशिक : जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना बँक खात्याचे ई-केवायसीसाठी 31 ऑगस्टपर्यंतची डेडलाइन दिली आहे. जिल्ह्यातील अद्यापही दोन लाख 18 हजार लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. दररोज तालुक्यांचा आढावा घेत आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अजूनही बहुतांश लाभार्थ्यांनी त्यांचा 12 आकडी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेत अशा लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात 4 लाख 50 हजारांमधून 48 टक्के म्हणजेच 2 लाख 18 हजार लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या मुदतीत आता ते पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तालुक्यांचा आढावा घेत आहेत. यावेळी नोंदणीत येणार्‍या अडचणी समजून घेताना त्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांकडून केल्या जात आहेत. शासनाने 15 ऑगस्टला अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेचा अखेरचा हप्ता जमा केला. परंतु, हा हप्ता जमा करतानाच ई-केवायसीसाठी महिनाअखेरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे या मुदतीत ई-केवायसी न करणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांना भविष्यात अनुदानास मुकावे लागणार आहे.

नुकसानीच्या अहवालाची प्रतीक्षा : जिल्ह्यात संततधार कायम असल्याने पिकांचे पंचनामे करताना यंत्रणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे नुकसानीचा अंतिम अहवाल हाती येण्यासाठी आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. चालू महिन्यात जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात संपूर्ण महिन्याची कसर भरून काढली. जिल्ह्यात 6 ते 10 तारखेदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार 5,700 हून अधिक हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अंदाजानुसार मंगळवार (दि.23)पर्यंत नुकसानीची अंतिम आकडेवारी हाती येणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्यात पावसाने उघडीप न दिल्याने पंचनाम्यावेळी यंत्रणांना अनेक अडचणींचा टप्पा पार पाडावा लागत आहे. त्यामुळे नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येण्यासाठी आणखीन दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:

Back to top button