नाशिक : यंदा देखाव्यात इच्छुकांचा दिखावा, जोरदार तयारी | पुढारी

नाशिक : यंदा देखाव्यात इच्छुकांचा दिखावा, जोरदार तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवांवर निर्बंध होते. यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याने अन् आगामी महापालिका निवडणूक असल्याने यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जाणार आहे. इच्छुकांकडून विविध ज्वलंत विषयांवर देखावे साकारण्यासाठी धडपड सुरू असून, त्यामध्ये दिखावा करण्याची एकही संधी सोडली जाणार नाही. सध्या शहराच्या विविध भागांत देखावे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कोरोना तसेच अन्य कारणांमुळे महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या, तरी त्या कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. काहींच्या मते, निवडणुकांचा बार दिवाळीपूर्वीच उडवून दिला जाईल, तर काहींच्या मते नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. अशात इच्छुकांमध्ये गोंधळाचे वातावरण असले, तरी प्रचाराची प्रत्येक संधी इच्छुक साधताना दिसत आहेत. अशात गणेशोत्सवात स्वत:चा दिखावा करण्यासाठी इच्छुकांकडून देखाव्यांवर भर दिला जात आहे. बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी उभारल्या जाणार्‍या देखाव्याची संपूर्ण जबाबदारी इच्छुकांनी घेतली आहे, तर काही माजी नगरसेवकांनी नागरिकांसाठी दहाही दिवस विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

दरम्यान, दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा लागला. यंदा आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू आहे. विशेषत: शहरातील मोठ्या सार्वजनिक मंडळांकडून विशेष प्रयत्न केले जात असून, यंदाचे देखावे नाशिककरांसाठी पर्वणी ठरण्याची शक्यता आहे. सध्या देखावे साकारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

विघ्न दूर होणार
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रोजगार हिरावलेल्या लेझर लाइट, साउंड सिस्टिम, विविध प्रकारचे वाद्यवृंद, नृत्य सादर करणारी मंडळी, विद्युत रोषणाई करणारे अशा सर्वांवरील विघ्न यंदाच्या गणेशोत्सवामुळे दूर होणार आहे. सध्या या मंडळींकडून बुकिंग चांगले असल्याने, यंदाचा उत्सव सर्वांसाठीच आनंदाचे पर्व घेऊन येणारा ठरणार आहे.

जिवंत देखाव्यांवर भर
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी मंडळे सरसावली आहेत. अशात यंदा जिवंत देखाव्यांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. कोरोनासह ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्रबोधनपर तसेच शौर्य गाथा यावर आधारित देखावे उभारले जाणार आहेत. सध्या बहुतांश मंडळांकडून देखावे उभारण्याचे काम सुरू आहे.

इच्छुकांमुळे मंडळांची चांदी
प्रभाग रचना, आरक्षण जाहीर झाले असून, मतदारयाद्याही तयार आहेत. केवळ निवडणूक जाहीर होणे बाकी असून, ती कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात शहरातील काही दिग्गज राजकारण्यांनी गणेश मंडळांना खूश करण्यासाठी भरमसाट वर्गणी दिली आहे. त्या बदल्यात आरतीचा मान तसेच बक्षीस वितरण व इतर काही महत्त्वपूर्ण उपक्रमांना हजेरी लावण्याचा मान या मंडळींना मिळणार आहे.

हेही वाचा :

Back to top button