जळगाव : यावल तालुक्यात तरुणाची निर्घृण हत्या, शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

जळगाव : यावल तालुक्यात तरुणाची निर्घृण हत्या, शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव : यावल तालुक्यातील चितोडा येथे एका तरूणाची अतिशय क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. आज सोमवार (दि.22) पहाटेच्या सुमारास सांगवी फाटा ते डोंगर कठोरा रस्त्यावर या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरूणाचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात मृत व्यक्ती हा मनोज संतोष भंगाळे (वय ४०) असून तो चितोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मनोज भंगाळे हे कुणाच्या वादात पडत नसून, ते शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीने मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने त्यांना ओढून आणत रस्त्याला लागून असणार्‍या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे.

पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी…
घटनास्थळी फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, फौजदार विनोद खांडबहाले सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले.  तज्ज्ञांनी परिसरातून पुरावे जमा केलेत. तर श्‍वान पथकाने या खुनाचा काही सुगावा मिळतो का? याची पाहणी केली. मनोज भंगाळे यांच्या पोटावर तसेच मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले असून मृतदेह पालथ्या अवस्थेत होता. मृत मनोज भंगाळे यांची मोटरसायकल मृतदेहापासून पाच-सहा फुटाचे अंतरावर मिळून आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत मनोज भंगाळे याचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा :

Back to top button