Nashik Malegaon : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘नफरतो, भारत छोडो’ फेरी | पुढारी

Nashik Malegaon : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘नफरतो, भारत छोडो’ फेरी

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
धार्मिक विद्वेषातून निर्माण झालेल्या कलुषित वातावरणाच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हम भारत के लोग आणि समविचारी संघटनांतर्फे शनिवारी (दि.19) ‘नफरतो, भारत छोडो’ ही मूक रॅली काढण्यात आली. त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. (Nashik Malegaon)

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. डॉ. आंबेडकर पुतळा ते एकात्मता चौकापर्यंत ही मूक फेरी निघाली. त्यात विविध फलक उंचावण्यात येऊन मूक आवाज उठविण्यात आला. देशात धार्मिक, राजकीय विद्वेषाचे वातावरण पसरलेय. त्यातून विचारवंत दाभोलकर, लेखक गोविंद पानसरे, पत्रकार कलबुर्गी, गौरी लोकेश यांच्यापासून आताच्या पहेलू खान, काश्मिरी पंडित व अमरावतीचे कोल्हे आदींवर हल्ले झाले. कटुतेचे वातावरण हटून सौहार्दपूर्ण व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

फेरीत काळे कपडे, फिती आणि हातात ‘नफरत छोडो’, ‘शहीद दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लोकेश अमर रहे’ या घोषणांचे फलक घेऊन मामको बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले, सुभाष परदेशी, अजय शहा, नाना महाजन, उमेश अस्मर, राष्ट्र सेवा दलाचे विलास वडगे, प्रवीण वाणी, रविराज सोनार, सुरेंद्र टिपरे, स्वाती वाणी, डॉ. कल्पना भावसार, डॉ. स्वप्नील खैरनार, रहिम शेख, दिलीप वडगे, नचिकेत कोळपकर, नसीम अहमद, राजू पवार, आशा भावसार, सुचेता सोनवणे, आनंद आढाव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button