नाशिक : ‘ई-केवायसी’साठी ३१ ऑगस्टची डेडलाइन | पुढारी

नाशिक : ‘ई-केवायसी’साठी ३१ ऑगस्टची डेडलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना बँकखात्याचे ई-केवायसी करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाइन केंद्र सरकारने दिली आहे. जिल्ह्यातील ४८ टक्के लाभार्थी शेतकरी ई-केवायसीपासून अद्याप दूरच आहे. या सर्व लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ते पूर्ण करून घ्यावे, अन्यथा त्यांना अनुदानाला मुकावे लागणार आहे.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन टप्प्यांत सहा हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येते. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचा बॅंकखाते आधारशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अजूनही बहुतांश लाभार्थ्यांनी त्यांचा १२ आकडी आधार क्रमांक बँकखात्याशी जोडलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने अखेरची संधी म्हणून येत्या ३१ तारखेपर्यंत ई-केवायसी करून घ्यायला सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे ४ लाख ५० हजार लाभार्थी आहेत. मात्र, त्यापैकी २ लाख १८ हजार लाभार्थ्यांनी अद्यापही त्यांची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्याच दरम्यान, १५ ऑगस्टला अनेक लाभार्थ्यांच्या बँकखात्यात योजनेचा अखेरचा हप्ता जमा झाला आहे. परंतु, ३१ ऑगस्टपर्यंत सगळ्याच शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा सप्टेंबरपासून त्यांना हक्काच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे.

तलाठी आंदोलनाचा फटका : ई-केवायसीसाठी केंद्राने ३१ ऑगस्टची डेडलाइन दिल्याने जिल्हा यंत्रणा सतर्क आहे. परंतु राज्यभरात सध्या तलाठी व अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रियेला या आंदोलनाचा फटका बसत आहे. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर शंभर टक्के ई-केवायसीचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ई-केवायसीसाठी केंद्र सरकारने ३१ ऑगस्टची मुदत दिली आहे. जिल्ह्यात साडेचार लाखांपैकी ४८ टक्के म्हणजे २ लाख १८ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. या शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. – गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक.

हेही वाचा:

Back to top button