Nashik Central Jail : या घटनेमुळे नाशिकचे मध्यवर्ती कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे | पुढारी

Nashik Central Jail : या घटनेमुळे नाशिकचे मध्यवर्ती कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
कैद्यांनी कारागृह पोलिस कर्मचार्‍याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे नाशिकचे मध्यवर्ती कारागृह (Nashik Central Jail) पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले. कैद्यांचे मनपरिवर्तन होण्यासाठी राज्यात सुधारवाणी कार्यक्रम राबविणारा पहिला कारागृह, अशी ख्याती असूनही मोबाइल, गांजा आढळणे, खून, हाणामार्‍या, आत्महत्या, कैद्यांचा संशयास्पद मृत्यू अशा एक ना अनेक घटनांमुळे सतत बदनामच राहिला आहे. वरिष्ठ अधिकारी कारागृहाची सरप्राइज व्हिजिट देत असले तरी ही व्हिजिट केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे. पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ असे चित्र दिसून येत आहे.

प्रभूचरण पाटील या पोलिस कर्मचार्‍यास खुनाच्या गुन्ह्यातील या आरोपींनी दगडाने तसेच लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केल्याने नाशिकचे कारागृह गुरुवारी चर्चेत आले. गेल्या दहा वर्षांत कारागृहात अनेक घटना घडल्या आहेत. कैद्यांच्या सततच्या उद्रेकामुळे 40 होमगार्डची मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती. पण हे मनुष्यबळही कैद्यांची संख्या पाहता कुचकामी ठरले आहे.

नाशिकचे कारागृह (Nashik Central Jail)  दर सहा महिन्यांनी प्रकाशझोतात येते. 24 एप्रिल 2015 ला टिप्पर गँगचे म्होरके पठाण बंधूकडून रेडिओचा चॅनल बदलण्यावरून कारागृहाचा शिपाई बिसमिल्ला शाबीर तडवी आणि त्यांचे सहकारी महेंद्र पगारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. तर 16 ऑक्टोबर 2013 च्या घटनेत शौचालयाच्या टाकीत कैदी नागो ऊर्फ नाना नामेदव पाटील याचा खून झाला होता. तसेच कैदी विशाल चौधरी याचा खून, तर दुसरा कैदी रमेश इप्पर गंभीर जखमी झाला होता. अन्य एका घटनेत खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सोपान पगारे याने दरवाजाच्या खिळे असलेल्या फळीने झोपेत असताना अन्य कैद्यावर हल्ला चढविला होता. 6 एप्रिल 2014 च्या घटनेत मधोसिंग भोसले या कैद्याने कारागृहाची भक्कम तटबंदी भेदून पसार झाला होता. पहाटे पाचच्या दरम्यान ही घटना घडली होती. 9 जुलै 2014 शौचालय टाकीत नागो ऊर्फ नाना नामदेव पाटील या कैद्याचा संशयित मृत्यू झाला होता. 11 सप्टेंबर 2014 ला मुकरम अलीम सुरत अलिखान या कैद्याकडे मोबाइल आढळला होता. 3 नोव्हेंबर 2014 ला मेहताब अली शौकत अली या कैद्याकडे मोबाइल आढळला होता. 20 मार्च 2015 होमगार्ड अल्ताफ दादामिया शेख याच्याकडे 201.30 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला होता.

टिप्पर गँगचा उद्रेक :

23 जुलै 2014 ला तर टिप्पर गँगच्या हाणामारी सादीक सलिम मेमन या कैद्यास बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी समीर पठाण, बाळू डोके, विजय अडांगळे, सुनील शेलार, सोमनाथ कदम, संदीप दोंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेवटी या गँगमधील काही गुन्हेगारांना औरंगाबादला हलविण्यात आले होते.

सुधारवाणी उपक्रम कागदावर :

29 जानेवारी 2015 रोजी तत्कालीन गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते मध्यवर्ती कारागृहात सुधारवाणी उपक्रमाचे उद्घाटन झाले. बंदिजनांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल, वाईट विचारामधून बंदिजनांना बाहेर येण्यास मदत मिळेल, मनावरील ताण कमी होईल असा उद्देश सुधारवाणी उपक्रमाचा होता. त्यात ऐ मालिक तेरे बंदे हम हे गीत, दैनिक बातम्या, भावगीत, भक्तिगीत, सुगम संगीत व मनोजरंजनाचे कार्यक्रम तज्ज्ञांच्या मुलाखती, नियमावली आदींचा समावेश होता. पण हा उपक्रम कागदावरच असल्याची चर्चा आहे.

हल्ल्यात अंमलदार गंभीर जखमी
येथील मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail)  12 ते 15 कैद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात कारागृहातील पोलिस अंमलदार गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कारागृहातील पोलीस कर्मचारी प्रभुचरण पाटील हे कर्तव्यावर असताना गुरुवारी (दि.18) त्यांच्यावर अचानक 12 ते 15 कैद्यांनी हल्ला चढिवला. या हल्ल्यात त्यांच्या हातावर-पायावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. हे सर्व कैदी खुनाच्या गुन्ह्यातील संशयित असून, या सर्व कैद्यांना काही महिन्यांपूर्वीच पुणे येथून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलिवण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा :

Back to top button