अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे आदेश | पुढारी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे आदेश

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या समन्वयाने मोहीमस्तरावर पूर्ण करून तातडीने अहवाल सादर करावा, अशी सूचना नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी (दि.१८ ऑगस्ट) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, पंचनामे प्रक्रियेविषयी कार्यशाळेचे यापूर्वीच आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार कृषी विभागाने तातडीने पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करीत वस्तूनिष्ठ अहवाल सादर करावा. ई- पीक पाहणी हे ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे ई- पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना डाऊनलोड करून घेत त्यावरूनच ऑनलाईन ई- पीक पाहणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाने शेतकऱ्यांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती करावी. जिल्हा पुरवठा विभागाने आयएसओ नामांकन प्राप्त करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार, तहसील कार्यालयाच्या समन्वयातून हे काम पूर्ण करावे. त्याबरोबरच शिधापत्रिका आधार क्रमांकाशी सलंग्न करून घ्यावी. गोदामांची नियमितपणे तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

मतदारांचे आधार कार्ड संलग्नीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचे सूक्ष्म नियोजन करीत आगामी काळात जास्तीत जास्त मतदारांचे आधार क्रमांक मतदार यादीशी अद्ययावत करून घ्यावेत. तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाची नवीन मतदार म्हणून नोंदणी करावी. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची मदत घ्यावी. एक ऑगस्टपासून नवीन महसूल वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे महसूल वसुलीवर भर द्यावा. महसूल वाढीसाठी नवनवीन स्त्रोतांचा शोध घ्यावा, असेही आयुक्त गमे यांनी सांगितले. यावेळी आयुक्त गमे यांनी रोजगार हमी योजना, भूसंपादन, अर्धन्यायिक प्रकरणांचाही आढावा घेतला.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. जून, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनाम्यांची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. बी. जोशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सी. वाय. पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक प्रशांत बिलोलीकर, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे (शिरपूर), उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन), डॉ. अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), सुरेखा चव्हाण, महेश जमदाडे (भूसंपादन), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. ए. तडवी, हेमंत भदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्यासह विविध विभांगाचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Back to top button