नाशिक : श्रावणसरींमध्ये दोन लाख भाविक पिनाकेश्वरी नतमस्तक | पुढारी

नाशिक : श्रावणसरींमध्ये दोन लाख भाविक पिनाकेश्वरी नतमस्तक

नाशिक (जातेगाव) : पुढारी वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पिनाकेश्वराच्या दर्शनासाठी श्रावणातील तिसर्‍या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोपरगाव, सराला बेट, कायगाव टोका आणि श्रीक्षेत्र वेरूळ येथून तीर्थ बेल व भोपळा या फळांमध्ये गोदावरी नदीचे भरून सुमारे 70 ते 120 किलोमीटर अनवाणी चालत आलेल्या कावडधारक भाविकांनी जलाभिषेक केला. पहाटे चारपासून सायंकाळी आठपर्यंत मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील दोन लाखांपेक्षा अधिक आबालवृध्दांसह महिला भाविकांनी भरपावसात दर्शनबारीमध्ये उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले.

श्री पिनाकेश्वर तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबविले. छत्रपती संभाजी नगर येथील संजय नगर मित्र मंडळाच्या सहकार्याने जातेगांव ग्रामस्थांच्या वतीने तसेच छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळ नांदगाव यांच्यावतीने भाविकांना खिचडी आणि चहाचे मोफत वाटत करण्यात आले असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण, बंडू पाटील, गणेश गवंडर, कैलास तुपे, अनिल, शिंदे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश उर्फ बबीकाका कवडे, मनोज रिंढे, धनराज पवार यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे, इश्वर पाटील, पोलीस हवालदार अनिल गांगुर्डे, पोलीस नाईक अनिल शेरेकर, रविंद्र चौधरी, प्रदिप बागुल, योगेश मोरे, मंगल सोणवने यांच्यासह सुमारे चाळीस पोलीस कर्मचार्‍यांनी व होमगार्ड आणि पोलीस मित्रांनी चोख बंदोबस्त ठेवला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बाबासाहेब चव्हाण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button