नाशिक : मनपा अधिकार्‍यासह ठेकेदाराच्या संगनमताचा डाव उधळला | पुढारी

नाशिक : मनपा अधिकार्‍यासह ठेकेदाराच्या संगनमताचा डाव उधळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या एका अतिरिक्त आयुक्तासह एका ठेकेदाराने संगनमताने दीड लाख तिरंगा ध्वज आणि मनपा कर्मचार्‍यांसाठी टीशर्ट, टोपी खरेदी करण्याचा मनसुबा मनपाच्या लेखा व वित्त विभागाने उधळून लावल्याने यासंदर्भात मनपात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे 11 हजार 840 ध्वज शिल्लक असतानाही खरेदीचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, परस्पर ठेकेदाराकडून खरेदी न करता निविदा प्रक्रिया राबविण्याचा अभिप्राय वित्त विभागाने दिल्याने अधिकार्‍याचा डाव उधळला गेला.

आजादी का अमृत महोत्सवांतर्गत मनपाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन लाख तिरंगा खरेदी केले. वितरण करत असताना अडीचपैकी जवळपास सव्वा लाख तिरंगा सदोष निघाल्याने ते जिल्हाधिकारी कार्यालयास परत करण्यात आले. राहिलेल्या 75 हजार तिरंग्यांपैकी 63 हजार तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. 11 ते 12 हजार तिरंगा शिल्लक राहिले. ध्वज शिल्लक असूनही मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी सदोष असलेल्या सव्वा लाख ध्वजांच्या बदल्यात दीड लाख ध्वज खरेदीसह 75 मनपा कर्मचार्‍यांना टीशर्ट, टोपी आणि लोगो खरेदी करण्यासाठी प्रस्ताव लेखा व वित्त कार्यालयाकडे सादर केला होता. मात्र, वित्त विभागाने या फाइलवर परस्पर ठेकेदाराकडून खरेदी न करता 36 लाख रुपयांची खरेदी असल्याने निविदा प्रक्रियेद्वारेच खरेदी करण्याचा सल्ला देत प्रस्ताव फेटाळून लावला. या प्रकाराबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना विचारले असता आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या परवागीनेच खरेदीचा प्रस्ताव सादर केला असल्याचे सांगितले. महापालिकेत नेहमीच संकट हीच संधी या तत्त्वाने काम केले जात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. मुळात 11 हजार ध्वजांचे वितरणच झाले नाही. असे असताना पुन्हा दीड लाख ध्वज खरेदी करण्याची खरोखरच आवश्यकता होती का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. ध्वजारोहणाच्या दिवशी मनपातील बांधकाम आणि नगर रचना विभागातील कर्मचार्‍यांसाठी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे लोगो असलेले टीशर्ट, टोप्या खरेदीचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त खाडे यांच्या कार्यालयाकडून लेखा विभागाला पाठविण्यात आला. खरेदी 36 लाखांची असल्यामुळे थेट खरेदी करता येणार नसल्याने निविदा काढून खरेदी करण्याची टिपणी लेखा विभागाने केली.

दहा दिवसांत 63 हजार 840 झेंड्यांची विक्री
महापालिकेने शिल्लक असलेल्या 75 हजार झेंड्यांपैकी दहा दिवसांत तब्बल 63 हजार 840 झेंड्यांची विक्री केली. त्यातून मनपाला 13 लाख 75 हजार 344 रुपये मिळाले आहेत. सिडको विभागात 15,300, पंचवटी- 11,511, नाशिक पूर्व- 13,613,नाशिकरोड- 7,154, सातपूर- 6,584 तर पश्चिम विभागातून 9,645 ध्वजांची विक्री झाली आहे. मनपाकडे आजमितीस 11 हजार 840 तिरंगा ध्वज शिल्लक आहेत.

मनपा आयुक्तांच्या परवानगीनेच एक लाख तिरंगा तसेच 75 कर्मचार्‍यांसाठी टीशर्ट व टोपी तसेच लोगो खरेदीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला होता. मात्र, लेखा विभागाने थेट खरेदी करण्यास नकार दिल्याने सीएसआर फंड तसेच सामाजिक व्यक्तींकडून खरेदी करून त्याचे वाटप केले.
– सुरेश खाडे
अतिरिक्त आयुक्त

एका टीशर्टची किंमत 450 रुपये
लोगोसह टीशर्ट आणि टोपी खरेदी महापालिकेने करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लेखा विभागाने या खरेदीला ब—ेक लावल्याने ठेकेदाराला तोंडी ऑर्डर देत 75 टीशर्ट व टोप्या अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयाद्वारे खरेदी करण्यात आल्या. एका टीशर्ट व टोपीची किंमत 450 रुपये लावण्यात आली. लेखा विभागाने खरेदीस मनाई केल्याने संबंधित अतिरिक्त आयुक्तांनी सीएसआरमधून 25 हजार ध्वज आणि 75 टीशर्ट खरेदी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खासगी संस्थेकडून खरेदी केलेल्या बेकायदेशीर टीशर्ट व टोप्यांच्या विक्रीची जोरदार चर्चा मनपात सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button