

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
सावदा रेल्वेस्थानक येथून दिल्लीच्या बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेद्वारे केळीवाहतूक केली जात आहे. परंतु, रेल्वेच्या गलथान कारभारामुळे केळी पिकाला मोठा फटका बसत आहे, असा आरोप केळी फळ बागायतदार युनियनने रेल्वेस्थानक येथे पत्रकार परिषदेत केला.
यावेळी डी. के. महाजन, नरेश सतेच्या, प्रवीण डिंगरा, राहुल पाटील, वसंत महाजन, प्रथमेश डाके, विठ्ठल पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रेल्वेचा गेल्या महिना दोन महिन्यांपासून अनागोंदी कारभार सुरू असून, वॅगन्स वेळेवर उपलब्ध करून न देता उशिरा रात्री उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे कापलेली केळी दिवसभर तशीच मालधक्क्यावर पडून असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, या समस्या विभागीय रेल्वे अधिकारी डीआरएम यांच्याकडे मांडण्यात आल्या. परंतु, डीआरएम केळी उत्पादक शेतकर्यांचे ऐकून घेत नसल्याने लोकप्रतिनिधी त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
लोडिंगच्या वेळेत दिरंगाई
रेल्वेच्या अनागोंदीमुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, माल लोडिंगसाठी सकाळची वेळ देऊन रात्री उशिरा डबे मिळत आहेत. ऑपरेटिंग सिस्टिममुळे उशीर होत असल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात येते. त्यामुळे शेतकर्यांची हजारो कोटी रुपयांचे केळीपीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.