नाशिक : मनपाची 45 डॉक्टर्स भरती प्रक्रियाच रद्द | पुढारी

नाशिक : मनपाची 45 डॉक्टर्स भरती प्रक्रियाच रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिन्यात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मनपा रुग्णालयांसाठी 45 डॉक्टरांची मानधनाने भरती प्रक्रिया राबवून निवडदेखील केली होती. मात्र, संबंधित भरती ही शासनाच्या संवर्गनिहाय आरक्षण पद्धतीने अर्थात, रोष्टरनुसार झाली नसल्याने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी भरतीच रद्दबातल ठरविली आहे. नियम डावलले गेल्याने पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याची नामुष्की वैद्यकीय विभागावर ओढवली आहे.

महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ पाहता, सरळसेवेने वा मानधन तत्त्वावर भरती प्रक्रिया होण्याची आजमितीस गरज आहे. त्यातही अग्निशमन विभाग, आरोग्य, वैद्यकीय विभागांतील पदांबरोबरच अभियंता या महत्त्वाच्या पदांची भरती करण्यासाठी महापालिकेने अनेक वर्षांपासून शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्यावर शासनाकडून अद्याप ठोस असे पाऊल उचलले गेलेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाशी मुकाबला करताना मनुष्यबळाची चणचण जाणवली. महापालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स नसल्याने, सेवेपासून रुग्ण वंचित राहात आहेत. नवीन बिटको रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होत असूनही त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकारी नाहीत. कोरोनाबरोबरच इतरही साथरोगांचा प्रादुर्भाव नेहमीच जाणवत असल्याने किमान आरोग्य वैद्यकीय विभागातील डॉक्टरांची भरती करण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न केले. कोरोना काळात सहा ते अकरा महिने अशा कालावधीसाठी मानधनावर वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र, तिसर्‍या लाटेनंतर या कर्मचार्‍यांची सुटी करण्यात आली होती. मात्र, आता नवीन बिटको रुग्णालय सुरू करण्यात आल्याने त्यासाठी मनुष्यबळाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 45 डॉक्टरांची मानधनावर भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी थेट मुलाखतीद्वारे 45 पदांसाठी 90 डॉक्टरांनी मुलाखती दिल्या होत्या. दोन दिवस चाललेल्या मुलाखत प्रक्रियेतून 41 डॉक्टरांनी महापालिकेत काम करण्याची तयारी दर्शविली होती. केवळ नियुक्ती आदेश देणे बाकी असल्याने त्याबाबत अंतिम मंजुरीचा प्रस्ताव आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. मात्र, ही भरती रोष्टर पद्धतीने झाली नसल्याने त्यांनी भरती रद्द केली.

सेवा प्रवेश नियमावलीच मंजूर नाही
मनपाच्या बिटको रुग्णालय, वडाळा गाव, गंगापूर गाव यासह अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. वैद्यकीय विभागासाठी 348 पदांच्या भरतीस मंजुरी मिळालेली असली, तरी सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाने मानधनावर भरतीची कार्यवाही केली. मात्र, आयुक्तांनीच ही भरती रद्द केल्याने नव्याने होणार्‍या भरतीकडे लक्ष लागले आहे.

या पदांची होणार नव्याने भरती
पद रिक्त संख्या
भिषक – 4
शल्य चिकित्सक – 2
अस्थिरोग तज्ज्ञ – 4
भूलतज्ज्ञ – 4
स्त्रीरोग तज्ज्ञ – 4
रेडिओलॉजिस्ट – 4
बालरोग तज्ज्ञ – 4
मानसोपचार तज्ज्ञ – 2
नाक,कान घसा तज्ज्ञ – 2
पॉथॉलॉजिस्ट – 2
मायक्रोबायोलॉजिस्ट – 1
वैद्यकीय अधिकारी – 10

हेही वाचा :

Back to top button