Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे | पुढारी

Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा शपथविधी होऊन ते शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात मंगळवारी (दि.9) आदिवासी विकासमंत्री पदावर विराजमान झाले आणि तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा राजकीय वनवास संपुष्टात आला. त्यांच्या मंत्रिपदामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, विकासात्मक राजकारण आणि शह-काटशहाचे राजकारण रंगात येईल, अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादीत असताना ज्यांनी आदिवासी विकास विभागाच्या योजना राबवून काँग्रेसच्या स्थानिक बड्या नेत्यांचे गड नेस्तनाबूत केले आणि राजकारणातील आपले स्थान बळकट केले. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून डॉ. गावित हे 1994 ला पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले व तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये आरोग्य राज्यमंत्री झाले. 1998 मध्ये ते राष्ट्रवादीत सामील झाले. तेव्हापासून सलग सहा पंचवार्षिक टर्म निवडून येत आहेत. 2014 पर्यंत सलगपणे ते समाजकल्याणमंत्री, आरोग्य तंत्र व उच्चशिक्षण मंत्री आणि आदिवासी विकासमंत्रिपदी कार्यरत राहिले. तथापि 2014 मध्ये मंत्रिपदासह राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

आदिवासी विकास विभागातील कथित घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे सलग आठ वर्षे त्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले होते.

निवडणुका महत्त्वाच्या
नजीकच्या काळात शहादा, नंदुरबार आणि नवापूर या तीन नगरपालिकांची निवडणूक आहे. या निवडणुकांनिमित्त भाजपचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव गटाची शिवसेना यांच्याशी सामना राहील. परंंतु, अशातच शिंदे गटाच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘भाजपविरुद्ध आपला लढा राहील’ असे जाहीर केले आहे. त्यामुळे डॉ. गावित यांना उघडपणे शिंदे गटाशीदेखील सामना करावा लागू शकतो. भाजपमध्ये छुपी गटबाजी आहे. ती दरी वाढते की घटते, हे येत्या काळात पाहायला मिळू शकते.

Back to top button