नाशिक : सत्ताधारी-विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी | पुढारी

नाशिक : सत्ताधारी-विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये समावेश असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. विरोधी गटाकडून संस्थेच्या मागील कारभारावर प्रश्चचिन्हे उपस्थित करणार्‍या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तर सत्ताधारी गटाकडून प्रत्युत्तर देताना विकासाचे मुद्दे पुढे आणले जात आहे.

मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा धुरळा उडाला असून, निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’ सुरू झाल्याचे चित्र आहे. विरोधी गटाचे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या समर्थकांकडून नीलिमाताई पवार यांच्या कामकाजाचे वाभाडे काढले जात आहे. सत्ताधार्‍यांनी गेल्या 10 वर्षांत पोरांच्या शिक्षणाचा बाजार मांडल्याची जहरी टीका सोशल मीडियातून विरोधी गट करत आहेत. तर नीलिमा पवार समर्थकांकडून आरोपांचे खंडन केले जात असून, ही निवडणूक भावनिक होणार असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियात वॉर रंगलेला असतानाच प्रमुख पदाधिकारी जिल्हा पिंजून काढत आहेत. सभासद मतदारांच्या भेटी घेण्यासाठी ते संबंधितांच्या घरांचे उंबरे झिजवत आहेत. मविप्र निवडणुकीमुळे गावागावांत प्रत्येक सभासद मतदाराला खूश करण्यासाठी अनेक युक्त्या काढल्या जात आहेत. त्यात निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांसह पदाधिकारी इच्छुक आहेत. त्यामुळे यंदाही मविप्र निवडणुकीत राजकीय रंग भरणार आहे. निवडणुकीसाठी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे प्रचार सुरू केला असल्याने जिल्ह्यातील वातारवण पेटू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडे मातब्बर इच्छुकांची संख्या जास्त आहे. मागील पराभवाची परतफेड करण्याचा चंग विरोधकांनी बांधला असून, सत्ताधार्‍यांकडून पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.

सत्ताधार्‍यांकडून सेवकांना बंगल्यामध्ये बोलावून घेतले जाते. त्यांना दमबाजी करत काम केले नाही तर लागलीच ताहाराबाद व जातेगाव यांसारख्या ठिकाणी बदली करण्याची धमकी दिली जात आहे. दमबाजी करून सेवकांना निवडणुकीच्या कामकाजाकरिता वापरणे म्हणजेच युद्धात लढण्याची मानसिकता नसलेल्या सैनिकांना युद्ध सीमेवर पाठवून आपल्या पराभवावर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. – अ‍ॅड. नितीन ठाकरे, माजी सभापती (मविप्र).

आजपासून अर्जवाटप
मविप्र पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीला शुक्रवार (दि.5)पासून खर्‍या अर्थाने सुरुवात होणार आहे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. 12 ऑगस्टला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button