नाशिक : जि. प. सेस निधी खर्चाच्या मनमानीला चाप | पुढारी

नाशिक : जि. प. सेस निधी खर्चाच्या मनमानीला चाप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार वितरणाचा खर्च सव्वादोन लाखांवरून 91 हजार रुपये झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने प्रस्तावित केलेल्या सव्वादोन लाखांच्या खर्चातील तरतुदींवर प्रशासनाकडून आक्षेप घेतल्यानंतर दुरुस्ती करून सुधारित प्रस्ताव दाखल केला आहे. सेस निधी खर्च करण्याची जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची मानसिकता यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे.

जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षण दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली जाते. विशेष कार्यक्रम घेऊन या आदर्श शिक्षकांना पुरस्कार वितरित केले जातात. या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात सेसमधून निधीची तरतूद केली जाते. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांची घोषणा नाही, तसेच पुरस्कार वितरण कार्यक्रमही झाले नाहीत. यावर्षीच्या पुरस्कार वितरणासाठी सव्वादोन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, शिक्षण विभागाने ही पूर्ण तरतूद खर्ची घालण्याच्या हेतूने वेगवेगळ्या कारणांसाठी निधीची तरतूद दाखवली. त्यात कार्यक्रमात पूजेसाठीच 14 हजार रुपयांची तरतूद केल्याचे समजते. तसेच पुरस्कार, शाल, साडी, सन्मानपत्र यासाठी 25 हजार रुपयांची तरतूद करून सभागृहासाठी चाळीस हजार रुपये तसेच इतर खर्च मिळून सव्वादोन लाख रुपयांच्या खर्चास परवानगी मागणारी नस्ती शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आली. पुरस्कार वितरणात कशाची पूजा केली जाते, तसेच एवढा मोठा खर्च असलेली नेमकी कोणती पूजा आहे, या प्रश्नाचे उत्तर शिक्षण विभागालाही देता आले नाही. यावरून वरिष्ठ अधिकार्‍यांनी शिक्षण विभागाची खरडपट्टी केल्याचे समजते. त्यानंतर शिक्षण विभागाने खर्चाचा नवीन आराखडा मंजुरीसाठी ठेवला असून, त्यात तो खर्च केवळ 91 हजार रुपये दाखवला आहे.

हेही वाचा:

Back to top button