नाशिक : खर्डेदिगर आश्रमशाळेत सुविधांचा अभाव | पुढारी

नाशिक : खर्डेदिगर आश्रमशाळेत सुविधांचा अभाव

कळवण : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खर्डेदिगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणार्‍या शासकीय निवासी आश्रमशाळेत सुविधांची वाणवा असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना ओल्या जागेवर बसण्याची व झोपण्याची वेळ आली आहे. या शाळेत तत्काळ भोजनगृह व स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, बंधारपाडा ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.

तालुक्यातील आदिवासी समाज व शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावा यासाठी शासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमार्फत कळवण तालुक्यात अनेक शासकीय निवासी आश्रमशाळा सुरू केल्या आहेत. अनेक वर्षे उपलब्ध असलेल्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये शाळा भरत होत्या. त्याचा खोल्यांमध्ये विद्यार्थी निवासी राहत होते. पालकांच्या मागणीनुसार या आश्रमशाळांना चांगल्या इमारती मिळाव्यात म्हणून तत्कालीन आदिवासी विकासमंत्री व कळवणचे माजी आमदार स्व. ए. टी. पवार यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील प्रत्येक शासकीय आश्रमशाळेला पक्क्या व चांगल्या इमारती मिळाल्या आहेत. तालुक्यातील पुनद खोर्‍यातील खर्डेदिगर येथील शासकीय आश्रमशाळेला इमारत मिळाली आहे. परंतु विद्यार्थ्यांना वसतिगृह नसल्याने ज्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेतात त्याच वर्गखोल्यात झोपण्याची वेळ आली आहे. विद्यार्थिनी वसतिगृहाचे पत्रे जीर्ण झाल्याने सडले आहेत. या ठिकाणाहून पाणीगळती होऊन संपूर्ण वसतिगृहात पाणीच पाणी होते. पावसाचा जोर वाढल्यास विद्यार्थिनींना रात्र जागून काढावी लागते. तर ओल्या जागेवरच झोपावे लागते. तसेच जेवणासाठी भोजनगृह नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत उघड्यावर जेवणास बसावे लागते. स्वयंपाकगृहापासून जेवणाचे ताट हातात घेऊन शाळेच्या मुख्य इमारतीत जेवणास यावे लागत असल्याने संपूर्ण जेवणात पावसाचे पाणी पडते. तसेच पाण्याने भिजलेले अन्न विद्यार्थ्यांना खावे लागते. त्यामुळे येथील अडचणी ओळखून प्रकल्पाधिकारी यांनी तत्काळ शासनाकडे पाठपुरावा करून वसतिगृह इमारत व भोजनगृह तसेच शुद्ध पाणीपुरवठा होईल अशी योजना करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, बंधारपाडा ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button