नाशिक मनपा आयुक्तांच्या नावाने बनावट एसएमएस द्वारे पैसै उकळण्याचा प्रयत्न | पुढारी

नाशिक मनपा आयुक्तांच्या नावाने बनावट एसएमएस द्वारे पैसै उकळण्याचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘मी एका बैठकीत आहे’, परंतु, मला या ठिकाणी फोन उचलता येत नाही. मला पैसे हवे असून, सायंकाळपर्यंत परत करतो’, असे एसएमएस पाठवून नाशिक महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावानेच फसवणूक करण्याचा प्रकार बुधवारी (दि.3) उघडकीस आला आहे. यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्ह्यासाठी वापर करण्यात आलेला फोन क्रमांक पुणे येथील असल्याचे समोर आले आहे.

बुधवारी (दि.3) सकाळी महापालिकेत बैठक सुरू असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांना त्यांच्या फोनवर एक संदेश आला. या संदेशानंतर आयुक्तांच्या नावाने कोणीतरी फसवणूक करत असल्याची बाब निदर्शनास आली. डॉ. पलोड यांनी आयुक्तांना तो संदेश दाखविल्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.

सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता राज्यातील तसेच परराज्यातील अनेक हॅकर तसेच भामट्यांकडून वेगवेगळी कारणे वापरून सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे. राज्य शासनातील सचिव दर्जाच्या अनेक अधिकार्‍यांच्या नावाने अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. बुधवारी (दि.3) सकाळी आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचा डीपी असलेल्या एका मोबाइल क्रमांकावरून अधिकार्‍यांना आर्थिक मदतीबाबतचे एसएमएस सुरू झाले. मात्र, संबंधित फोन क्रमांक अधिकार्‍यांकडे सेव्ह नसल्याने काय करावे, असा प्रश्न सर्वांनाच पडला. याच दरम्यान आयुक्तांच्या दालनात ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेबाबत बैठक सुरू असताना घनकचरा व्यवस्थापनचे अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी हा संदेश आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला असता आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना धक्काच बसला. यानंतर इतरही अधिकार्‍यांनी त्याच प्रकारचे एसएमएस आल्याचे आढळून आले. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आयुक्तांनी तत्काळ पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच डॉ. पुलकुंडवार यांनी तत्काळ आपल्याशी संबंधित सर्व परिचितांच्या फोनवर एसएमएस पाठवत आपल्या नावे कोणीतरी आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब निदर्शनास आणून देत सावध केले. त्या अनोळखी क्रमांकावरून येणार्‍यास कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहनही आयुक्तांनी केले. याबाबतची वार्ता मनपाच्या मुख्यालयात वार्‍यासारखी पसरली अन् त्याबाबत चर्चा सुरू राहिली.

माझा कार्यालयीन कामासाठी 9702100056 हाच एकमेव फोन क्रमांक असून, नागरिक तसेच अधिकारी, कर्मचार्‍यांनी अन्य नंबरवर संपर्क साधू नये, असे आवाहन आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी केले. सोशल मीडियाद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले असून, माझ्याबाबतही असाच प्रकार घडला आहे. याबाबत मी सर्वांना संपर्क साधून सजग करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका

मंचरमधील व्यक्तीचा क्रमांक
आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या नावाने 9834246263 या फोन क्रमांकावरून एसएमएस पाठवून आर्थिक मागणी करण्यात आली तसेच याच नंबरवर आयुक्तांच्या नावाचा प्रोफाइल पिक्चर सेव्ह करून अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित फोन क्रमांक हा पुण्यातील मंचर येथील एका व्यक्तीचा असल्याची बाब समोर आली असून, नाना गुंडा, राजेश कणसे अशी नावे समोर येत आहेत. घटनेसाठी वापरण्यात आलेला क्रमांक कुणीतरी हॅक केला असून, संबंधित क्रमांक असलेल्या व्यक्तीनेदेखील त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button