धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू | पुढारी

धुळे : भरधाव कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली ; नाशिकचे दाम्पत्य ठार, जळगाव-धुळ्यातील दोघांचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर येथे कानबाईचा उत्सव आटोपून नाशिककडे परत निघालेल्या कारला झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण तर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली काम करणारा चालक असे चौघेजण ठार झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी कार उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा सहभाग आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गव्हाणे फाट्यानजीक हा भीषण अपघात झाला. नाशिक येथे राहणारे चव्हाण हे पत्नी मिना आणि एक चार वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी असे चौघे मित्राची कार (क्र.एमएच 02 डीएस 1277) घेवून शिरपूर येथे शालक दशरथ नाना कोळी यांच्याकडे कानबाई मातेच्या उत्सवासाठी आले होते. उत्सव आटोपून ते कारने नाशिकला घराकडे निघाले होते. कार ही संदीप चव्हाण हे चालवित होते. त्यादरम्यान सुराय गव्हाणे फाट्यानजीक पुलावरून खाली उतरतांना त्यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली. त्यात कारमध्ये बसलेले संदीप शिवाजी चव्हाण, मिना संदीप चव्हाण (रा. नाशिक), तसेच गणेश थोटू चौधरी (रा. चोपडा जि. जळगाव) आणि ट्रॅक्टर चालक पांडुरंग धोंडु माळी (55 रा. सोनगीर ता. धुळे) हे चौघे ठार झाले आहेत. मृतांची नाव आहेत. तर चिमुकल्यांसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नरडाणा पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. गंभीर जखमींना तत्काळ धुळे जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच चव्हाण यांचे शालक दशरथ कोळी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर अपघातातील कारमधील मयत गणेश चौधरी हे चव्हाण यांचे नातेवाईक नाहीत. त्यामुळे ते प्रवासी म्हणून बसले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

Back to top button