नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा
सर्वसामान्यांना राजकारणापासून वंचित ठेवत धनदांडग्यांना राजकारणात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात चालढकल करत अडीच वर्षे वाया घालवली. आरक्षणविरहित निवडणुका पार पाडण्याचा मनसुबा ठेवून महाविकास आघाडी सरकारने वेळेत सादर केलेले निरगुडे व बांठिया आयोगाचे प्रस्ताव रद्द करत बदमाशी केली. मात्र, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच 27 टक्के ओबीसी आरक्षण जाहीर केले. मविआ सरकारनेच ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला असून, शिंदे – फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण मिळाल्याचे प्रतिपादन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल सातपूरला भाजपच्या वतीने आयोजित विजय मेळाव्यात ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, 1994 पासून ओबीसी आरक्षण लागू आहे. असे असताना काँग्रेसचे नेते माजी मंत्री नाना पटोले यांच्या नेहमीच सानिध्यात राहणारे अशोक डोंगरे नावाच्या व्यक्तीने ओबीसी आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. ओबीसी आरक्षणाबाबत सन 2016 मध्ये न्यायालयाला योग्य माहिती देण्यात आल्याने आरक्षण टिकले. त्यानंतर पुन्हा सन 2018 मध्ये काँग्रेसच्या एका माजी आमदाराच्या मुलाने या आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेतली असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबत मविआ सरकारने निरगुडे आयोग तयार केला. निरगुडे आयोगाने ओबीसी आरक्षणाबाबत 435 कोटींच्या निधीची मागणी केली होती. मविआ सरकारने निधी दिलाच नसल्याने पुन्हा आरक्षण रेंगाळले. तसेच मविआ सरकार आणखी दोन वर्षे सत्तेत असते, तर आणखी दोन वर्षे ओबीसी आरक्षण मिळाले नसते, असा दावा केला.

या प्रसंगी माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या संकल्पनेतून मोदी सरकारच्या आठ वर्षांत राबवलेल्या कल्याणकारी योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बानवकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. विविध पदाधिकारी, सोसायटी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान आ. सीमा हिरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ईडी सरकारच्या अभिनंदनाने केली. तसेच ईडी सरकार म्हणजे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्पष्ट उल्लेख केला. व्यासपीठावर आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, दिनकर पाटील, महेश हिरे, विजय साने, प्रशांत जाधव, मच्छिंद्र सानप, विक्रम नागरे, राजेश दराडे, मंडल अध्यक्ष भगवान काकड, रामहरी संभेराव, जगन पाटील, शंकर वाघ, सुनील केदार, गौरव बोडके, रवि पालवे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button