Nashik Zilla Parishad : सर्वसाधारण तालुक्यांतील नेतृत्वाची संधी हुकली | पुढारी

Nashik Zilla Parishad : सर्वसाधारण तालुक्यांतील नेतृत्वाची संधी हुकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सर्वसाधारण आठ तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या 48 गटांपैकी 29 गट अनुसूचित जमातीसाठी, तर चार गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. त्याचवेळी आदिवासी बहुल तालुक्यांमधील 34 पैकी 26 गट सर्वसाधारण झाले आहेत. चक्राकार आरक्षणाचा फटका बसल्याने सर्वसाधारण क्षेत्रातील ग्रामीण नेतृत्वाची जिल्हा परिषदेची संधी हुकणार आहे. परिणामी काही मोजक्याच गटांमध्ये ग्रामीण नेतृत्वाला संधी मिळू शकणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत 2022 मध्ये 84 गट आहेत. त्यातील अनुसूचित जमातीसाठी 33, अनुसूचित जातीसाठी सहा व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीन जागांवरील आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या उपस्थितीतीत निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाभरातून माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. निवडणूक आयोगाने यावेळी आरक्षण सोडतीबाबत सुधारित आदेश दिले आहेत. चक्राकार आरक्षणाबरोबरच प्रत्येक प्रवर्गाचा लोकसंख्येचा उतरता क्रम, 2002 ते 2017 पर्यंतच्या पाच निवडणुकांमधील गटनिहाय आरक्षण, गटाची पुनर्रचना झालेली असल्यास त्यातील समान आरक्षण असलेल्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक गावांमधील पूर्वीचे आरक्षण याबाबत नवीन सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आरक्षण सोडतीवेळी उपस्थितांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते. याबाबत अधिकार्‍यांकडून दिल्या जाणार्‍या उत्तरांनी नागरिकांचे समाधान होत नसल्याने अखेरीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कोणाला काही आक्षेप असतील त्यांनी हरकती नोेंदवाव्यात. येथे पुराव्याशिवाय बोलू नये, असे स्पष्टपणे सांगितले. यावेळी चिठ्ठी पद्धतीद्वारे आरक्षित गट निश्चित करण्यात आले. ध—ुव पिंगळे या विद्यार्थ्याच्या हातून आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्व प्रवर्गांमधील महिलांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील माळेगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी, निफाड तालुक्यातील विंचूर, कसबे सुकेणे, चांदवड तालुक्यातील तळेगावरोही व इगतपुरी तालुक्यातील वाडीवर्‍हे या गटांमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यातील माळेगाव, तळेगावरोही व कसबे सुकेणे हे गट स्त्री राखीव झाले आहेत.

अनुसूचित जमातीसाठी 33 गट

अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना यापूर्वी या प्रवर्गासाठी आरक्षित असलेले गट वगळून उर्वरित गटांचा विचार करण्यात आला. तसेच लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने पहिले 33 गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर त्या 33 गटांमध्ये आतापर्यंत अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव नसलेले गट स्त्रियांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानुसार साकोरे, जायखेडा, वीरगाव, लोहोणेर, घोटी बुद्रुक, पालखेड, न्यायडोंगरी, खर्डे-वाखारी, पिंपळस, नांदूरशिंगोटे, देवगाव, धोडांबे, भालूर, पिंप्री सय्यद, वडाळीभोई, जातेगाव, उगाव, दुगाव, नगरसूल, पळसे, टाकळी हे गट अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गसाठी आरक्षित करण्यात आले. ‘नामाप्र’साठी तीन गट ः नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी केवळ नामपूर, कनाशी व पिंपळगाव बसवंत हे तीन गट आरक्षित करण्यात आले असून, त्यातील कनाशी व पिंपळगाव बसवंत हे गट स्त्री राखीव झाले आहेत. 42 गट सर्वसाधारण असून, त्यातील 20 गट महिलांसाठी आरक्षित आहेत. 84 गटांपैकी 42 गट महिलांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग या 42 जागांपैकी 22 गट महिलांसाठी आरक्षित निघाल्याने उर्वरित सर्वसाधारण 42 जागांपैकी 20 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.

Back to top button